एसटी धावणार आता सीएनजीवर
   दिनांक :03-Mar-2019
वर्षाला एक हजार कोटी रुपयाचा फायदा : रावते
पंढरपूर 
  डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चालत असलेल्या एसटी महामंडळाला नवसंजीवनी देण्यासाठी ‘लालपरी’ अशी ओळख असलेली एसटी बस आता सीएनजीवर चालविण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य परिवहन मंत्रालयाने घेतला असून, यामुळे एसटी महामंडळाला वार्षिक एक हजार कोटी रुपयाचा फायदा होणार आहे.
 

 
 
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबतची माहिती दिली. सीएनजी हा नैसर्गिक वायू असून, यामुळे वाढत्यला प्रदूषणालाही आळा बसणार आहे, असे रावते यांनी सांगितले.
 
राज्यात सीएनजी व्यवस्था अंमलात आणण्यासाठी सुमारे १८ हजार बसेसमध्ये किरकोळ दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. एसटी यासाठी आपले पंप बाहेर बसविणार असून, यातून सर्वसामान्य ग्राहकांनाही त्यांच्या गाडीत सीएनजी भरता येणार असल्याचे रावते म्हणाले.
 
सध्या एसटीमधील डिझेलवर एक हजार कोटी रुपयांचा खर्च होत आहे. हा खर्च सीएनजीमुळे वाचणार असून, अशा पद्धतीने सीएनजीवर बस चालविणारा महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार आहे. पंढरपूर येथे उभारण्यात येणार्‍या भक्तनिवास व नवीन स्थानकाच्या भूमिपूजनाला रावते आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
 
पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी येणार्‍या बसेसमधून मिळणार्‍या उत्पन्नातून महामंडळ कर्मचार्‍यांचा पगार होऊ शकतो. ही महत्त्वाची यात्रा असल्याने यासाठी वेगळे नियोजन केले जात असल्याचेही रावते यांनी सांगितले.
 
मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणार
 
एसटी कर्मचार्‍यांच्या मुलांना आता ७५०रुपये इतका पॉकेट मनी देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या मुलांच्या विदेशातील उच्च शिक्षणाचा खर्च देखील महामंडळ उचलणार आहे. याशिवाय, महामंडळ कर्मचार्‍याच्या मुलींसाठी एक लाख रुपयांच्या ठेव योजनेतून आतापर्यंत एक हजार कर्मचार्‍यांना लाभ झाल्याचेही रावते यांनी म्हणाले.