यूएनएससी ने ओसामाच्या मुलावर घातले र्निबध
   दिनांक :03-Mar-2019
आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमझा बिन लादेन दहशतवादी असल्याचे स्पष्ट करून संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) त्याच्यावर र्निबध घातले आहेत. अल-कायदाचा सध्याचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याचा वारसदार म्हणून हमझाकडे पाहिले जात असून तो सध्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद १२६७ आयसिस, अल-कायदा र्निबध समितीने गुरुवारी हमझा याचे नाव र्निबध असलेल्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे. अमेरिकेने हमझाची माहिती देणाऱ्यास १० लाख डॉलरचे बक्षीस  जाहीर केले आहे. हमझा बिन लादेन याचे नागरिकत्व रद्द केल्याची घोषणा सौदी अरेबियाने शुक्रवारी केली होती.
सौदी अरेबियामध्ये जन्मलेला हमझा बिन लादेन हा अल-कायदाचा अधिकृत सदस्य असल्याचे अल-जवाहिरी यांनी जाहीर केल्याचे सुरक्षा परिषदेने एका निवेदनाद्वारे सांगितले. हमझाने अल-कायदाच्या दहशतवाद्यांना दहशतवादी हल्ले करण्याचे आवाहन केले आहे. हमझाकडे जवाहिरीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे, असे सुरक्षा परिषदेने म्हटले आहे. हमझावर र्निबध घालण्यात आल्याने त्याची मालमत्ता जप्त होणार असून त्याच्यावर प्रवासबंदी, शस्त्रबंदी घालण्यात येणार आहे. ऑगस्ट २०१५ पासून हमझा आपल्या साथीदारांना अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांवर हल्ले करण्याचे आदेश व्हिडियो संदेशाद्वारे देत आहे. .