अमेरिकेचा आरोप चीनने फेटाळला
   दिनांक :30-Mar-2019
'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझरला जागतिक दहशतवादी जाहीर करण्याच्या प्रस्तावावर नकाराधिकार वापरत हिंसक इस्लामिक दहशतवादी गटांना चीन संरक्षण देत असल्याचा अमेरिकेचा आरोप चीनने फेटाळला आहे.
 
 
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पेओ यांनी बुधवारी चीनवर हा आरोप केला होता. चीन देशातील मुस्लिम समाजावर अन्याय करत असून, देशाबाहेरील इस्लामिक दहशतवादी संघटनांना आंतरराष्ट्रीय निर्बंधांपासून संरक्षण देत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. पुलवामा हल्ल्यानंतर, मसूद अझरविरोधातील निर्बंधांच्या प्रस्तावाला चीनने चार वेळा रोखले आहे, या पार्श्वभूमीवर पोम्पेओ यांनी ही टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले, 'या समितीच्या नियमांनुसार, तांत्रिक स्तरावर हा प्रस्ताव रोखला आहे. चीनने या प्रस्तावाला तांत्रिक स्थगिती दिली म्हणजे, दहशतवाद्यांना संरक्षण दिले, असे कोणता देश म्हणत असेल, तर तांत्रिक स्थगितीचा वापर करणारे सर्वच देश दहशतवाद्यांना संरक्षण देत असतात का?'