अमिषा पटेलवर २.५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
   दिनांक :30-Mar-2019

‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अमिषा पटेलवर पुन्हा एकदा फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. एका चित्रपट निर्मात्याने अमिषा आणि तिच्या बिझनेस पार्टनर कुणालवर २.५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आमिषा आणि कुणालने २.५ कोटी रुपये अद्याप परत न केल्याचं निर्मात्याने म्हटलं आहे.

 
 
 

‘देसी मॅजिक’ या चित्रपटासाठी अमिषा आणि कुणालने चित्रपट निर्माते अजय कुमार सिंह यांच्याकडून २.५ कोटी रुपये घेतले होते. २०१३ साली या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार होती आणि २०१८ साली हे चित्रिकरण पूर्ण होणार होतं. या चित्रपटातून मोठा फायदा होणार असून अमिषाने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर व्याजासह संपूर्ण पैसे परत देणार होती. मात्र आमिषाने अद्यापही हे पैसे परत केले नाहीयेत, असं अजय कुमार यांनी सांगितलं.

 

दरम्यान, आमिषाचा हा चित्रपट आजतागायत प्रदर्शित झाला नाही. याविषयी तिच्याकडे विचारणा केल्यावर तिने ३ कोटी रुपयांचा चेक दिला होता. मात्र तो बाऊन्स झाला. इतकंच नाही तर या प्रकरणी तिला जाब विचारल्यावर तिने थेट पैसे देणार नसल्याचं सांगितलं. त्यासोबतच काही दिग्गज कलाकारांसोबतचे फोटो दाखवत धमकी दिली. त्यानंतर याप्रकरणी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं मला पुन्हा सांगण्यात आलं. परंतु याबाबत अधिक कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही, असं अजय कुमार सिंह यांनी सांगितलं.