नीरव मोदी, मल्ल्याला एकाच सेलमध्ये ठेवणार का?
   दिनांक :30-Mar-2019
लंडन न्यायालयाचा सरकारी वकिलाला सवाल
लंडन,
पीएनबी कर्ज घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी सुरू असताना काही गमतीदार प्रसंगही घडले. भारताने मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि हिर्‍यांचा व्यापारी नीरव मोदी या दोघांच्याही प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. त्यांना एकत्रच भारताच्या स्वाधीन केल्यास, तिथे दोघांनाही एकाच कारागृहात आणि एकाच सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे काय, अशी विचारणा वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाच्या न्यायाधीश एम्मा अर्बोटनॉट यांनी केली. यावेळी न्यायालयात एकच हशा पिकला.
 
 
 
सुनावणीच्या सुरुवातीलाच न्या. एम्मा म्हणाल्या की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मी, विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश दिला होता, याची आठवण मला आहे. त्यामुळे मला असे जाणून घ्यायचे आहे की, विजय मल्ल्याला भारतात नेमके कुठे ठेवणार आहे आणि आता नीरव मोदीलाही भारताच्या स्वाधीन केल्यास त्याची जागा कुठे राहणार आहे.
 
यावर भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणार्‍या सरकारी वकिलाने सांगितले की, या दोघांचेही प्रत्यार्पण झाल्यानंतर त्यांना मुंबईत नेण्यात येणार आहे आणि कदाचित दोघांनाही ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. विजय मल्ल्यासाठी तर या कारागृहातील कक्ष तयारही करण्यात आला आहे. तेव्हा न्या. एम्मा म्हणाल्या की, मल्ल्याच्या प्रत्यार्पण सुनावणीच्या काळात आम्ही त्या कारागृहाचा व्हीडिओ बघितला आहे. तिथे भरपूर मोकळी जागा आहे, मग त्याच सेलमध्ये नीरव मोदीचीही व्यवस्था करणार काय? यावर मात्र सरकारी वकिलाने कुठलेच उत्तर दिले नाही.