मोदींच्या सभेची जय्यत तयारी
   दिनांक :30-Mar-2019
 
राज्यातील प्रचाराचा नारळ वर्धेत फुटणार
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा वर्धेत येत आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराचा नारळ वर्ध्यातच फोडला जाणार आहे.
2014 ची लोकसभा निवडणूक 10 एप्रिल रोजी झाली होती. त्या निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा मोदी यांनी मार्च 2014 मध्ये ज्या मैदानावर केला होता, त्याच स्वावलंबी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी 1 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता विजय संकल्प रॅलीला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी केली असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. या सभेसाठी 2 लाख लोक येतील अशी माहिती लोकसभा प्रमुख सुधीर दिवे आणि अविनाश देव यांनी दिली. जिल्ह्यात मोदींची लाट वाहू लागली असून नरेंद्र मोदी वर्ध्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसआयजीची चमू वर्ध्यात दाखल झाली आहे. सभास्थळी 30 बाय 60 फुटाचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 22 जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे भाजपा उमेदवार हंसराज अहिर, वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस, गडचिरोलीचे अशोक नेते, शिवसेना नेते अनंतराव गुढे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खा. दत्ता मेघे, खा. विकास महात्मे, भाजपाचे अमरावती जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, दादाराव केचे, आ. अनिल बोंडे, माजी खा. विजय मुडे, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. डॉ. रामदास आंबटकर, आ. अरुण अडसड, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, आ. अनिल सोले, उपेंद्र कोठेकर, रिपाई नेते विजय आगलावे, डॉ. शिरीष गोडे, अशोक िंशदे, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिप अध्यक्ष नितीन मडावी, लोकसभा प्रमुख सुधीर दिवे यांची उपस्थिती राहणार आहे.
 
या नियोजनात 50 हजार खुर्च्या, 2 डी मध्ये खाली बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. अति महत्त्वाचे व्यक्ती, पदाधिकार्‍यांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था, महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था, पंतप्रधानांच्या भाषणाचा प्रत्येकाला आनंद घेता यावा म्हणून मोठाल्या एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. सभास्थळी येण्यासाठी साईनगर, श्रीनिवास कॉलनी भागात 7 तर जगजीवनराम शाळेच्या बाजूने 5 मोठे गेट तयार करण्यात आले असून महिलांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र गेटही तयार करण्यात आले आहे.
 
उन्हाचे दिवस लक्षात घेता शहरातील विविध भागात आणि सभास्थळी पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात सामाजिक संघटनांनी पिण्याचे पाणी वाटप करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला आहे.
लोकसभा मतदार संघातून येणार्‍या वाहनांसाठी शहरातील विविध भागात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आयटीआय कॉलेज टेकडी मैदान, भोयर कॉलेज, सर्कस ग्राऊंड, रामनगर स्पोर्टिंग ग्राऊंड, न्यू इंग्लिश हायस्कूल मैदान, श्रीनिवास कॉलनी ग्राऊंडवर वाहनं उभी करता येणार आहेत.
 
हिंगणघाट, समुद्रपूर येथून येणारी वाहनं सर्कस मैदान, देवळी, पुलगाव, वर्धा तालुका येथील वाहनं सर्कस मैदान, रामनगर स्पोर्टिंग ग्राऊंड, श्रीनिवास कॉलनी मैदान, धामणगाव व चांदूर रेल्वे येथील वाहनं सिंदी (मेघे) शांतीनगर मार्गे सर्कस मैदान, आर्वी, आष्टी, कारंजा, वरूड, मोर्शी येथील वाहनं आयटीआय टेकडी मैदान, सेलू, सिंदीरेल्वे येथून येणारी वाहनं भोयर कॉलेजमध्ये उभी करता येणार आहेत.
सभेसाठी येणार्‍या कोणत्याही व्यक्तीची गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात येणार असून वर्धा शहर 1 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जाम झालेले असेल, अशी माहिती दिवे यांनी दिली.