अमेरिका, नाणेनिधीपुढे पाकची मदतीची झोळी
   दिनांक :30-Mar-2019
कराची,
आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अर्थसाहाय्य मिळण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तानची अमेरिका आणि नाणेनिधी यांच्यातील मतभेदांची दरी दूर झाली, तर काही अटी-शर्तींवर मे महिन्याच्या मध्यास हे आर्थिक साह्य मिळू शकेल, असा आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा अंदाज आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानला सहा अब्ज अमेरिकी डॉलर्सचे, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 12 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे अर्थसाहाय्य मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी येथे माध्यमांना दिली.
 
 
 
आम्ही मदत करू शकणार्‍या सर्वांशी संपर्क करीत आहोत, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. पाकिस्तानमधील तेहरीक ए इन्साफ या पक्षाच्या नेतृत्वाखालील पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्याकडे पाकिस्तान सरकारने मदतीसाठी झोळी पसरली आहे.