पाकने दहशतवादाच्या विरोधात ठोस पावले उचलावी
   दिनांक :30-Mar-2019
- भारत-अमेरिका यांचे संयुक्त आवाहन
- सुरक्षा परिषदेत भारताची पाकवर टीका
वॉशिंग्टन,
पाकिस्तानने आपल्या भूमीवरून संचालित होणार्‍या दहशतवादी कारवाया आणि दहशतवादी संघटना यांच्याविरोधात ठोस पावले उचलावीत, यावर भारत आणि अमेरिकेने भर दिला आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांकडून असलेला धोका लक्षात घेत, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या दहशतवादविरोधी संयुक्त कार्यकारी गटाची बैठक शुक्रवारी येथे पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांनी पाकिस्तानला हे आवाहन केले. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत, यावर दोन्ही देशांचे मतैक्य यावेळी झाले.
 
 
 
या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव महावीर सिंघवी यांनी केले. तर, अमेरिकन प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व नॅथन सेल्स यांनी केले. दरम्यान, अतिरेक्यांचे समर्थन करणारे देश आपल्या कारवाईला आणि निष्क्रियतेस योग्य ठरवीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील, अशी टीका भारताने पाकिस्तानवर केली आहे.
 
संयुक्त राष्ट्राकडून प्रतिबंधित दहशतवादी आणि संघटनांविरुद्ध सक्तीने निर्बंध लागू करण्याचे आवाहनही भारताने सुरक्षा परिषदेकडे केले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीकाही केली.
सुरक्षा परिषदेने गुरुवारी सर्वसहमतीने एका प्रस्तावाचा स्वीकार केला. याद्वारे सदस्य-देशांना दहशतवादाचे अर्थसाहाय्य रोखण्यासाठी प्रयत्न वाढविण्याबाबत सांगण्यात आले.
 
भारताने याबाबतच्या प्रस्तावाचा स्वीकार करताना स्वागतपर प्रतिक्रिया व्यक्त केली. दहशतवादविरुद्धच्या प्रयत्नात हा मैलाचा दगड ठरेल. दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यासाठी प्रयत्न करण्यार्‍या प्रस्तावाचे भारत स्वागत करीत आहे, असे सय्यद अकबरुद्दीन म्हणाले.