अमेरिका, नाणेनिधीपुढे पाकची मदतीची झोळी
   दिनांक :30-Mar-2019
कराची :
 आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अर्थसहाय्य मिळण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तान आणि या दोन्ही संस्थांमधील मतभेदांची दरी दूर झाली, तर काही अटीशर्तींवर मे महिन्याच्या मध्यास हे आर्थिक साह्य मिळू शकते, असा अंदाज आहे.
 
 
अमेरिकेकडून पाकिस्तानला सहा अब्ज अमेरिकी डॉलरचे, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून १२ अब्ज अमेरिकी डॉलरचे अर्थसहाय्य मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी दिली. पाकिस्तानमधील तेहरीक ए इन्साफ या पक्षाच्या नेतृत्वाखालील पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याकडे पाकिस्तान सरकारने मदतीसाठी झोळी परसली आहे. 'आम्ही मदत करू शकणाऱ्या सर्वांशी संपर्क करीत आहोत,' असे असद उमर यांनी फायनान्शियल टाइम्स या वृत्तपत्राशी बोलताना स्पष्ट केले.