शेंडी विंचरणे सुरू आहे!
   दिनांक :30-Mar-2019
   
 
 ही तो रश्रींची इच्छा!
 
र. श्री. फडनाईक
एवढ्यात तूप खूप महाग कसे झाले, याचा आम्ही शोध घेतला असता, कळले, की निवडणुका उंबरठ्यावर आल्या असल्याने तुपाचा खप वाढला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे! आम्ही गोंधळलो! या समीकरणाचा आम्हाला काही बोध होईना. शेवटी आमच्या एका राजकीय मित्राने आमचा मानसिक गुंता सोडविला. त्याने दिलेल्या स्पष्टीकरणावर आधारित आमचे हे भाष्य!
त्याच्या मते, या निवडणुकीत सारे विरोधी पक्ष हिंदूंची शेंडी विंचरण्याच्या व त्यानंतर तिच्यावर तूप चोपडण्याच्या चढाओढीत लागले आहेत. दिसली शेंडी की विंचर तिला आणि चोपड तूप! एकदाच नव्हे, पुन: पुन:! दिसले मंदिर की नेसले सोवळे! सोवळ्याचा रंग भगवाच राहील याचीही दक्षता हे कट्टर हिंदू सध्या घेत आहेत! सप्तरंगातला फक्त भगवा! त्यामुळे एकीकडे सोवळ्याच्या, तर दुसरीकडे जानव्याच्या किमतीत वाढ झाली आहे! त्याचा दुसरा फायदा असा झाला, की महागाई वाढल्याच्या बोंबा मारायलाही निमित्त मिळाले! विद्यमान मोदी सरकार हिंदूविरोधी आहे, याचा पाहा हा दाखला! सोवळे महागले! जानवे महागले! प्रसादाचे चिरंजीचे दाणे महागले! फक्त (आमच्यासारखे) बत्तासे तेवढे स्वस्त आहेत!
 
 
 
 
 
परवा विरोधी पक्षाचा एक नेता राममंदिरात गेला. भक्तिभावाने गेला. रामाला पाहून गहिवरला! मूर्तींना न्याहाळले! राम, लक्ष्मण, सीता, हनुमान! पुन: पुन्हा पाहिलं! चष्मा काढला, पुसला, घातला आणि निरखून पाहिलं! सीता दिसली; ऊर्मिला नाही! लक्ष्मण दिसला; शत्रुघ्न नाही! म्हणाला ही उणीव भरून काढणे आवश्यक आहे! असा भेदभाव घटनेची पायमल्ली करतो! घटना वाचविलीच पाहिजे! रामासमोर प्रतिज्ञा घेतली : संविधान वाचविण्याची शपथ घेतली! त्यासाठी रामाच्या खांद्यावरचे धनुष्य हिसकण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते पेलविले नाही! तिथेच धपकन पडला!
सारांश हाच, की सध्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मंदिर मंदिर प्रदक्षिणा सुरू आहेत; देवासमोर दक्षिणा ठेवण्याचेही स्मरण ठेवले जात आहे! मंदिरांचे भाग्य उजळले आहे!
 
हे सारे आठवण्याचे कारण, मध्य प्रदेशातील एका राजाने परवा स्वत:च पिटलेली दवंडी! मी हिंदू आहे, द्वारिका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा 1983 पासून शिष्य आहे, असे हा (दिग्गी) राजा म्हणाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मी माझ्या धर्माचे ढोल बडवत नाही, असे, हा राजा दवंडी पिटतानाच सांगत होता! मध्य प्रदेशात तुपाची आयात एवढ्यात अचानक का वाढली याचे उत्तर आम्हाला मिळाले! शेंड्यांची संख्या जास्त असल्याने, त्या बहुसंख्यक असल्याने तूप हांड्यानेच घ्यावे लागणार ना!
 
वृत्तपत्रात आलेली बातमी तंतोतंत खरी असेल तर आणखी एक स्पष्ट झाले : दिग्गी राजांना संघाचे वावडे नाही! रा. स्व. संघाशी माझा कोणताही वाद नाही. संघ जर हिंदूची संघटना असेल, तर मी सुद्धा हिंदूच आहे, असे ते म्हणाल्याचा तपशील या वृत्तात आहे.
राजकारणाचा किडा असलेल्या आमच्या एका मित्राने हे वृत्त वाचले, त्याचा अभ्यास केला. म्हणाला, माझा अंदाज आहे, की दिग्गी राजा नागपुरात येऊन संघ कार्यालयाला भेट देतील, प्रभात शाखेत हजेरी लावतील! कॉंग्रेस नेत्यांना, (श्रेष्ठींसमोर) नेहमीच अटेंनशनमध्ये उभे राहण्याचा सराव असल्याने, ‘आराम’ असा आदेश दिल्यावरही ते ‘दक्ष’ स्थितीतच राहतील! ‘विकीर’चा आदेश झाल्यावरही विचलित होणार नाहीत! असे झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही! बहुधा त्यांचा अंतरात्मा जागा झाला आहे. निवडणूक आली, की अनेकांना आतला आवाज ऐकू येतो! मतदान झाल्यावर बहिरेपणा येतो! हरकत नाही, या काळात तरी ते, ‘मी हिंदू आहे’, असे गर्वाने म्हणतात हे काय कमी आहे! तसेही, ज्या पक्षाचे दिग्गी राजा उमेदवार आहेत, त्याच पक्षाचे प्रतिनिधित्व करून पंतप्रधान झालेल्या स्व. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1963 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये रा. स्व. संघाच्या चमूला सन्मानाने सहभागी करून घेतले होते. (तशी सरकार दप्तरी नोंद नाही, असा एखाद्या नियतकालिकाचा दावा असू शकतो! अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे!) त्यामुळे उद्या कॉंग्रेस उमेदवारांनी खाकी प्यँट, पांढरा शर्ट आणि हाती दंड घेऊन प्रचार सुरू केला तर त्यात नवल नसावे! तयार कपडे बनविणार्‍या कंपनीने वेगवेगळ्या साईजच्या खाकी प्यँटा आणि शुभ्र पांढरे शर्ट अर्जंटली तयार करून ठेवावेत! गठ्ठ्याने तयार करावेत!