यादव कुटुंबातील भाऊबंदकी; तेजप्रतापची नौटंकी
   दिनांक :30-Mar-2019
 
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात उभी फुट पडली आहे. तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव या लालुप्रसादांच्या दोन मुलांममधील भाऊबंदकी चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे लालूप्रसादांचे तुरुंगातील जगणेही हराम झाले आहे.
 
लालूप्रसादांच्या कुटुंबात सध्या तेजप्रताप आणि मिसा भारती एकीकडे तर तेजस्वी यादव दुसरीकडे आहे, अशी विभागणी झाली आहे. राज्यसभेच्या सदस्य असलेल्या मिसा भारती तेजप्रतापची बाजू घेत असल्यामुळे राजदच्या स्टार प्रचारकांच्या पहिल्या यादीत मिसा भारती यांचे नाव नव्हते, नंतर ते नाव यादीत आले, हा भाग वेगळा. लालूप्रसादांनी आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून शहाणपणा दाखवत तेजस्वी यादवची निवड केल्यानंतर तेजप्रताप यादव नाराज झाले. राबडीदेवी यांची भूमिका मात्र तेजप्रताप यादवला लालूप्रसादांचा वारस करण्याची होती.
 

 
 
 
तेजस्वी यादवच्या तुलनेत तेजप्रताप यादव यांच्यात राजकीय समज आणि प्रगल्भतेचा अभाव आहे. याला त्यांचे शिक्षणही कारणीभूत असावे. तेजप्रताप बारावी नापास आहे.
नितीश कुमार मंत्रिमंडळात लालूप्रसादांनी तेजप्रतापला आरोग्य मंत्री बनवले, मात्र तेजप्रतापला मंत्रिपदाची शपथही नीट घेता आली नाही. तेजप्रताप यादव यांनी शपथ घेताना अपेक्षित ऐवजी उपेक्षित शब्दाचा वापर केला होता. तसेच तब शब्दाऐवजी जब शब्दाचा उपयोग केला. राज्यपालांनी ही चुक तेजप्रताप यादव यांच्या लक्षात आणून देत त्यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली.
कोणत्याही प्रकारची शैक्षणिक आणि राजकीय पात्रता नसताना तेजप्रताप यादव यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. अपहरण उद्योग या भोजपुरी चित्रपटात तेजप्रताप यादव यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका केली होती. त्यामुळे प्रत्यक्षातही आपण मुख्यमंत्री झालो पाहिजे, असे स्वप्न तेजप्रताप यादव यांना पडू लागले. आपण मोठे असतानाही वडिलांनी आपल्या लहान
 
भावाला उपमुख्यमंत्री बनवल्यामुळे तेजप्रताप यादवचे डोके फिरले.
2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेजप्रताप यादव तेजस्वीपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले होते. तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघात 22733 मतांनी विजयी झाले होते, तर तेजप्रताप यादव महुआ मतदारसंघात 28155 मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे तेजस्वी यादवपेक्षा राज्यात आपण जास्त लोकप्रिय आहोत, असा तेजप्रताप यादव यांचा समज झाला असावा.
बेताल वक्तव्य करण्याची तसेच बेताल वागण्याची तेजप्रताप यादव यांची पहिलीच वेळ नाही. लालूप्रसाद यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढल्यानंतर तेजप्रताप यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय अश्लाघ्य शब्दात टीका केली होती.‘लालूजी को मारने की साजीश हो रही है, हम चुप नही बैठेंग, नरेंद्र मोदीजी की खाल उधडवा लेगे,’ अशा शब्दात तेजप्रताप यादव बरळले होते. मात्र, देशाच्या पंतप्रधानबद्दल असे आक्षेपार्ह विधान केल्यानंतरही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.
 
या विधानावर गदारोळ माजल्यानंतर लालूप्रसादांनी तेजप्रताप यादवची पाठराखण केली होती. कारस्थान करून आपल्या वडिलांची सुरक्षा व्यवस्था काढली जात आहे, हे समजल्यावर कोणत्याही मुलाची प्र्रतिक्रिया अशीच राहील, असे लालूप्रसाद यादव म्हणाले होते. मात्र, तेजप्रताप यादवचे शब्द मला मान्य नाही, अशा शब्दांचा वापर यापुढे करू नको, असे मी त्याला सांगितले आहे, अशी सारवासारव लालूप्रसाद यांनी नंतर केली होती.
तेजप्रताप सर्वाधिक चर्चेत आले ते लग्नानंतर वर्षभराच्या आत. आपल्या पत्नीला ऐश्वर्या रायला घटस्फोट देण्याच्या वृत्तामुळे. तेजप्रतापची पत्नी ऐश्वर्याही अशाच तुल्यबळ राजकीय घराण्यातील. तेजप्रताप बारावी पास तर ती पदव्युत्तर शिक्षण घेतलेली. ऐश्वर्याचे आजोबा दरोगाप्रसाद राय बिहारचे माजी मुख्यमंत्री होते, तर वडील चंद्रिका राय राजदचे ज्येष्ठ नेते आणि लालूप्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळात होते. मात्र, तेजप्रताप राय यांचे आपल्या पत्नीशी नेमके कोणत्या कारणावरून बिनसले, ते समजू शकले नाही.
 
आपल्या वडिलांना राजदने उमेदवारी द्यावी, असा ऐश्वर्याचा आग्रह होता, असा तेजप्रताप यादवचा दावा आहे. मात्र, हा दावा पटण्यासारखा नाही. कारण, ऐश्वर्याचे वडील आधीपासूनच राजदचे नेते आणि लालूप्रसादांचे निकटवर्ती आहेत. आता तर ते लालूप्रसादांचे व्याहीही झाले आहेत. त्यामुळे आपल्या वडिलांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह ऐश्वर्या राय आपल्या सासर्‍याकडे करेल, यावर विश्वास बसत नाही.
समजा तिने असा आग्रह केला तरी यात तेजप्रताप यादवला राग येण्यासारखे काय आहे. एखादवेळ ऐश्वर्या रायच्या वडिलांना राजदची उमेदवारी मिळण्यासाठी तेजप्रताप यादव यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करायला हवा होता. पण येथे तर उलटेच झाले. ऐश्वर्याच्या वडिलांना चंद्रिका राय यांना राजदने सारण मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा तेजप्रताप यादव यांनी दिला.
तेजप्रताप यादव यांच्याबद्दल ट्विटरवर वाटेल तो मजकूर येत असतो. घरातील या भांडणामुळे कधी काळी बिहारमधील शक्तिशाली असलेले लालूप्रसादांचे घराणे पोखरले गेले आहे.
 
‘नादान वो है जो मुझे नादान समजने की कोशीश करते है लेकीन कौन कितने पानी मे है इसका मुझे पता है,’ असे ताजे ट्विट तेजप्रताप यादव यांनी केले आहे. त्यामुळे घरोखरच कोण नादान आहे, हे बिहारची जनता दाखवून देणार आहे. मुळात बिहारचे आरोग्यमंत्री राहिलेल्या तेजप्रताप यादव यांचे मानसिक आरोग्य ठिक नाही, याचे हे लक्षण म्हणावे लागेल.
या भाऊबंदकीत लालूप्रसाद यांच्या कुटुंबाचे काय व्हायचे असेल ते होवो. पण यादव कुटुंबातील ही भाऊबंदकी घराणेशाहीच्या राजकारणावर विश्वास ठेवणार्‍या राजकीय पक्षांना आणि काही घराण्यांना इशारा देणारी आहे. यातून योग्य तो बोध सर्व पक्षांनी घेण्याची गरज आहे.