ओढ
   दिनांक :31-Mar-2019
कथा 
प्रा. कमलाकर देविदास हणवंते
 
गुणवंतरावांची पत्नी मालतीला मुलाकडे जाऊन एक महिना झाला होता. परंतु मालतीने त्यांना फोनवरून पोहोचल्याचे एकदा सुद्धा कळविले नव्हते. या विचाराने गुणवंतराव खूप बेचैन झाले. यापूर्वी मालतीकडून असे कधीच घडले नव्हते. पंधरा मिनिटांसाठी त्यांना बाहेर जायचे असले, तरी त्या गुणवंतरावांना विचारीत असत.
 
यावेळी ‘‘येतेहो, काळजी घ्या!’’ असे बोलणे दूरच राहिले, गुणवंतरावाकडे मालतीने पाहिले सुद्धा नव्हते. असे मालतीचे अबोलपण अन्‌ विचित्र वागणे गुणवंतरावांच्या चांगलेच जिव्हारी झोंबले होते. तरीही मालती फोन करेल, या अपेक्षेने ते फोनभोवती घुटमळायचे. आता बरेच दिवस झाले तरी मालतीने गुणवंतरावांना फोन केला नव्हता. या विचारात ते घर-आंगणात येरझारा मारीत असता फोनची घंटा वाजली. तसा त्यांनी उत्साहाने रिसिव्हर उचलला. ‘‘मालती, एकदा सुद्धा तुला माझ्याशी बोलावेसे वाटले नाही, असे मी तुझे कोणते घोडे मारले आहेत!’’ भावनेच्या भरात फोनवरून त्यांचा मुलगा यश बोलतोय हे सुद्धा ते विसरले होते. ‘‘यश, तुझ्या आईला फोन दे ना.’’ आईला फोन न देता यश म्हणाला- ‘‘बाबा, तुम्ही कसे आहात?’’
 
‘‘मला काय धाड भरली आहे. मी चांगला हट्टा-कट्टा आहे. सकाळी फिरायला जातोय्‌. दोनदा पोटभर जेवतोय्‌. सायंकाळी फिरायला जातोय्‌. सूर्यास्त कसा होतो हे सुद्धा मला कळत नाही. रात्री एकदा झोपलो की सकाळी पाचलाच उठतो. हो पण, आईला फोन देण्याऐवजी तू मला हे का विचारतोय्‌?’’ गुणवंतराव आता चिडले होते.
 
‘‘यश, एक महिन्यानंतर तुला मला फोन करावसा वाटलाय्‌. अरे होऽ, तू बिझी माणूस, अन्‌ मी रिकामटेकडा.’’
‘‘अहो बाबा, माझे ऐकू न तर घ्या!’’ यशला पुढे बोलू न देता गुणवंतराव मघापेक्षा चिडून म्हणाले- ‘‘तुला माझी काळजी वाटली म्हणून तू मला फोन केला नाहीस!’’
 
गुणवंतरावांच्या बोलण्यातील हेतू आणि चिड यशच्या लक्षात येताच आता त्याचाही थोडासा संयम ढळलाय्‌. ‘‘बाबा, तुम्ही पासष्टी ओलांडलीय, तरीपण तुमची चिड-चिड कमी न होता उलट वाढलीय्‌.’’ आता गुणवंतरावही खूपच चिडले होते. ‘‘तुला हेच माझ्याशी बोलायचे होते?’’ बोलता बोलताच त्यांचा दम भरून आला. हे यशच्या लक्षात येताच तो शांतपणे म्हणाला- ‘‘बाबा, आईने तुम्हाला फोन केला नाही म्हणून तुम्ही सुद्धा आईला फोन केला नाही?’’
 
‘‘यश, मला ठाऊक होतं की तू हेच मला म्हणशील.’’ बोलतानाच गुणवंतरावाने फोन बंद केला.
फोन बंद करण्याचे कारण गुणवंतरावांना ठाऊक असूनही ते गोंधळलेत. अस्वस्थही झाले. जेवणातही त्यांचं लक्ष नव्हतं. घोटपाणी करीत कसेबसे त्यांनी जेवण आटोपलं आणि बैठकीतल्या खुर्चीत बसलेत. बैठकीतल्या दोघांच्या फोटोकडे बघता बघता ते आठवणीत हरविल्या गेले. दीड महिना यश आणि दोन महिने रूपाच्या बाळंतपणाचे असे साडेतीन महिने सोडले तर एक वा दोन दिवसांपेक्षा मालतीला सोडून ते एकदाही एकटे राहिले नव्हते. मालती दररोज टेबलावरची कागदं, कॅनव्हास, रंगपेट्या आणि ब्रशांची आवरासावर करायची. सकाळी प्राणायाम करून गुणवंतराव घरी आले की- गरमा गरम कपभर दूध प्यायला द्यायची. ऑफीसला जाताना काही विसरले की त्याची आठवणही करून द्यायची. सायंकाळी घरी परत येण्यास दहा-पंधरा मिनिटे उशीर झाला तरी त्यांचा जीव वर-खाली व्हायचा. असे एखाद्या व्रतीसारखे सेवानिवृत्त होईपर्यंत मालतीने गुणवंतरावांना सांभाळले होते. मालती रागीट, बडबड्या, तोंडाळ असल्या तरी मनमोकळ्या आणि सुस्वभावी होत्या. गुणवंतरावांशी बोलताना मालतीला कधी-कधी भान राहत नसे. भावनेच्या भरात त्या मनात येईल ते बोलायच्या. काही क्षणात विसरूनही जायच्या. नामांकीत संस्थेकडून गुणवंतरावांना चित्रकलेच्या कौशल्याबद्दल पुरस्कार आणि सन्मानचिन्हे मिळाली होती. त्याबद्दल साधे दोन शब्द सुद्धा त्या बोलल्या नव्हत्या.
 
गुणवंतरावांना मालतीचा स्वभाव ठाऊक असल्यामुळे त्यांनाही त्याचे वाईट वाटत नव्हते. आता गुणवंतरावांना सेवानिवृत्त होऊन चार महिनेही झाले नव्हते, तोच त्यांना मालतीच्या स्वभावात झालेल्या बदलांची जाणीव झाली. मात्र स्वभावात
झालेल्या बदलांचे कोडे सुटण्याऐवजी वाढले होते. गुणवंतराव सकाळी बाहेरून फिरून
घरी आले की हातपाय धुवायचे कितीदा सांगावे ? बाहेर जातांना घाणेरडा रुमाल नेत जाऊ नका सांगून सांगून कंटाळले. आंघोळीचे गरम पाणी थंडगार होईपयरत आंघोळीचा कंटाळा. घरी उशिरा येण्यास तर धरबंधच राहिलेला नाही. अशा या ना त्या कारणावरून मालती सतत कटकट करायची. गुणवंतराव एका कानाने ऐकून हसत दुसर्‍या कानाने
सोडून द्यायचे. त्यामुळे कधी-कधी मालती रागाने घरातील भाड्यांची आदळआपट करायची. तोंडपट्टाही सुरू असायचा. हे गुणवंतरावांना आठवताच ते खडबडून खुर्चीतून उठलेत. अधिरतेने त्यांनी फोनचा रिसिव्हर उचलला. ते मालतीशी बोलणारही होते, तोच त्यांची मुलगी रूपा फोनवरून म्हणाली- ‘‘बाबा, आई तुमची काळजी करते अन्‌ तुम्ही एकदा सुद्धा आईला फोन करू नये?’’ यशचे ऐकून न घेताच फोन बंद केला! एवढा तुम्हाला आई आणि यशचा राग आलाय्‌? रूपाच्या बोलण्यातील त्रागा त्यांच्या लक्षात आला.
 
ते फोन बंद करणारही होते. तशी रूपा कळवळून म्हणाली- ‘‘बाबा, एकदा तरी आईशी बोला हो!’’ आता मात्र मुलीच्या बोलण्यांतील कारुण्यामुळे ते गलबललेत. काहीसे ओशाळले सुद्धा!
आता गुणवंतराव मालतीला फोन करण्यासाठी उतावळे झाले होते. त्यांनी फोनही उचलला होता, परंतु नुकत्याच घडलेला प्रसंग आठवताच त्यांनी फोन ठेवलाय. त्या दिवशी सकाळचा प्राणायाम आटोपून ते घरी आले होते. बाहेरच्या नळाखाली मालती भांडी धुत होत्या. मालतीसमोरच त्यांनी हातपाय धुतलेत अन्‌ बैठकीतल्या खुर्चीत बसलेत. खुर्चीत बसून त्यांना दहा मिनिटंं झाली होती. तरीपण मालतीने नेहमीप्रमाणे त्यांना कपभर दूध प्यायला दिले नव्हते. ‘‘मालू ऽ दूध आणते ना!’’ त्यांनी एवढेच म्हणायची देरी, त्या फणफणत घरात येऊन रागाने म्हणाल्या- ‘‘हात-पाय न धुता दूध मागताय्‌?’’
 
‘‘मालू तुझ्यासमोरच मी हातपाय धुतलेत. अगं एवढा मी गावंढळ नाही की अडाणी!’’ ते सहजगत्या हसत-हसत म्हणाले. खरे तर हेच मालतीला अपेक्षीत नसल्यामुळे त्यांच्या अंगाचा रागाने भडका झाला. ‘‘तुम्ही गावंढळ तर आहात शिवाय अडाण्याहूनही निप्पटर आहात. मी आहे म्हणून सहन करते, माझ्या ऐवजी दुसरी असती तर केव्हाचीच तुम्हाला सोडून गेली असती!’’
‘‘मालू, उगीच उचलली जिभ टाळूला लावून असे भलते-सलते बोलू नकोस.’’
 
‘‘तुमच्या सारख्या अडाणी, खोटारड्या माणसाला स्वत:चे दोष दिसण्याऐवजी माझ्यावर दोषारोपण करायला आवडते ना!’’ त्या रागाने थरथरत होत्या. त्यांचा कंठही दाटून आला होता. आता गुणवंतरावांचाही संयम ढळला होता. ‘‘मालू खरे सांग, मी खरोखरच अडाणी, खोटारडा आहे?’’ ‘‘हो-हो ऽ मी हजारदा म्हणेल की तुम्ही अडाणी आणि खोटारडे आहात.’’
बोलता-बोलता त्याही रडकुंडीस आल्या होत्या.
 
‘‘ मालू माझ्या खोटारडेपणाचे एखादे उदाहरण....!’’
‘‘आज सकाळीच तुम्ही पाय धुतले नाही तरी म्हणता की पाय धुतलेत, हा खोटारडेपणा नव्हे ? तुम्ही तर माझ्याशी खरे बोलण्यात अपमान समजताय्‌!’’
तेव्हा रागाने चिडून गुणवंतराव म्हणाले-‘‘ माझ्यावर खोटे आरोप करण्यास तुला आनंद मिळतो का ?’’
गुणवंतरावांचे उद्गार ऐकून त्या रागाने थरथरत हातवारे करीत म्हणाल्यात- ‘‘मी सहनशील आहे म्हणून तुम्ही माझा छळ करता आहात. आजपर्यंत मी तुमच्या अशा बेगडी वागण्याला बळी पडले, परंतु आता नाही सहन होत. माझ्या सहनशीलतेचा नकाहो कडेलोट करू.’’ गुणवंतरावांना आठवताच ते गहिवरलेत.
 
आता फोनवरून मालतीचा मृदू आणि कोमल आवाज ऐकून गुणवंतराव भावविव्हळ झाले. घडलं सगळं विसरुन हळूवारपणे म्हणाले-‘‘मालू कशी आहेस ग तू ! वेळेवर रक्तदाबाची गोळी घेत असते ना! माझी प्रकृती एकदम उत्तम आहे. आपली घरकामवाली पार्वती मावशी माझी खूप काळजी घेते.’’ गुणवंतरावांनी एका दमात मालतीला मनातलं सगळं सांगितलं. ‘‘हो पण, मी फोन केला नाही म्हणून तुम्ही माझ्यावर रागावलेत!’’
 
‘‘मालू , मी तुझ्यावर कशा रागवेल? गावी जाताना तू माझ्याशी बोलली नाही, याचे मला वाईट वाटले. तरीपण फोनवरून तू माझ्याशी बोलशील असे वाटत होते. घरात करमतही नव्हते. दोन-चार दिवसाने मी यशकडे येणारही होतो, पण तुझे ते शब्द
आठवताच हातातला फोन सुद्धा खाली पडायचा!’’
‘‘माझेच चुकले हो! तुम्हाला न विचारता यश सोबत गावी गेले.’’ गुणवंतरावांना मालतीच्या बोलण्यातील अपराधीपण जाणवले. तसे ते गहिवरून म्हणाले- ‘‘मालू, जे घडायचं ते टळतं नसते. म्हणून काय त्याचा विचार करायचा असतो? जाऊ दे , मनाला
लावून घेऊ नकोस.’’
 
‘‘जाऊ दे कसं! तुम्हाला सांगितल्याशिवाय मला बरे कसे वाटणार!’’
‘‘मालू , भूतकाळात जे घडले ते विसरायचे असते. वर्तमानातला प्रत्येक क्षण आपला समजून तो क्षण आनंद आणि समाधानात घालवायचा असतो.’’
‘‘हो ऽ ना, मग मी सांगते ते ऐका. तुम्हाला सेवानिवृत्त होऊन चार महिनेही झाले नव्हते. तशाच आपल्याकडे माझी मावस बहीण शामली आणि तिचे यजमान आले होते. त्या दिवशी मसाले भरलेल्या वांग्याची भाजी केली होती. शामली अन्‌ तिच्या यजमानाला
भाजी खूप आवडली होती आणि तूम्ही मात्र ह्या-ह्या करीत फिदीफिदी हसले होते. तुमचे हसणेच मला खटकले होते. नव्हे तुम्ही माझ्या मावस बहिणीसमोर माझा अपमान केलाय्‌ असेही वाटले त्या दिवसापासून मलाही बदला म्हणून तुमच्यावर हसायचे होते. म्हणून मी हात-पाय धुतलेत काय? घाणेरडा रुमाल, आंघोळ अशाच या ना त्या कारणावरून सतत कटकट करीत होते. माझे असे वागणे मलाच खटकत होते. परंतु तुमचे ते हास्य काही केल्या विसरल्या जात नव्हते. सतत कट-कट करूनही तुम्ही माझ्याशी कधी रागाने बोलले नाही की शब्दानेही तुम्ही मला दुखावले नाही. कधी-कधी तर तुमच्या अशा वागण्याचा मला खूप खूप राग यायचा.’’
 
‘‘मालू तू सरळ सुस्वभावाचीच नव्हे तर साधी भोळीपण आहे. हेच तुझे साधेभोळेपण
मला खूप खूप आवडते!’’
‘‘ते सुद्धा मी समजून आहे. तरीही मी तुम्हाला खोटारडा, अडाणी,गावंडळ म्हणून हिणवलेय्‌ , दोषारोपणही केले. चुकलं माझं, क्षमा करा मला. अहो ऽ मी तुमची उद्या वाट बघतेय्‌.’’ बोलता बोलता मालती शोकविव्हळ झाली.
‘‘तुझेच काय माझेही चुक लेय्‌. पाय धुतले नाही कबुल केले असते तर वांग्याची भाजी चांगली होऊनही मी हसलो होतो. यश माझ्याशी बोलण्यासाठी आतुरलेला असूनही मी त्याच्याशी एक शब्द बोललो नव्हतो,’’ बोलता बोलता गुणवंतराव भावनेचा गहिवर आवरू शकले नव्हते. हे मालतीच्या लक्षात येताच डोळ्यातील अश्रू पुसीत हुंदके देत हातातला फोनचा रिसिव्हर केव्हा खाली पडला ते सुद्धा त्यांना कळले नव्हते.