मंकडींग- इकडचे आणि तिकडचे...
   दिनांक :31-Mar-2019
 
 
सध्या आयपीएल सुरू आहे. म्हणजे इकडेही सुरू आहे आणि तिकडेही आहे. क्रिकेट आणि राजकारण हा आमचा धर्मच आहे. इकडे इंडियन प्रिमियर लीग सुरू आहे आणि राजकारणात- सत्ताकारणात इंडियन पब्लिक लीग सुरू आहे. दोन्हीकडे मंकडींगची जोरात चर्चा आहे. आयपीएलच्या एका सामन्यात पंजाब संघाच्या रविचंद्रन अश्विनने राजस्थानच्या जॉस बटलरला मंकडींगने बाद केले. म्हणून त्याच्यावर टीका सुरू आहे. त्याने असे काही चुकीचे, गैरकृत्य केलेले नाही. क्रिकेटच्या कायद्यानुसारच तो वागला, तरीही त्याने बाकायदा अनैतिक कृत्य केले, खिलाडू वृत्तीचा धरून त्याचे कृत्य नाही, यावर चर्चा सुरू आहे. त्याने पंजाब संघाकडून खेळताना गोलंदाजीच्या एन्डला म्हणजे नॉन-स्ट्रायकर एंडला क्रीझ सोडून उभा असलेल्या बटलरला चेंडू टाकण्यापूर्वीच धावचित केले. अर्थात याला धावबाद असेच म्हणतात, मात्र सर्वात आधी असे बाद करण्याची कृती भारताचे थोर खेळाडू विनू मंकड यांनी केली होती. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेलेला असताना, बिली ब्राऊन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला विनू मंकड यांनी दोन वेळा अशा पद्धतीने बाद केले. त्यामुळे या प्रकाराला मकंडींग असे नाव पडले. त्यावेळीही यावरून खूप वाद झाला होता. क्रिकेकची जागतिक संघटना आयसीसीने त्यावेळीही निर्वाळा दिला होता की, क्रिकेटच्या नियमाने हे चुकीचे नाही.
 

 
 
 
आता नेमके असेच काहीसे राजकारणातही झाले. वास्तविक ते राजकारणात नाही तर प्रशासनात, सत्ताकारणात झाले. भारताने एक मोठी मिळकत मधल्या काळात केली. शक्ती नावाचे उपग्रह नियंत्रण करणारे एक उपकरण यशस्वी करणारा भारत या जगातला चौथा देश ठरला. आता हे देशाच्या शास्त्रज्ञांनी साध्य केले. ते आता सिद्ध झाले. त्याचा प्रयोग आणि योजना कधीपासून सुरू असेल, पण त्याला आताच्या सरकारने मंजुरी दिली. प्रयोग यशस्वी झाला की नाही, हे पाहण्यासाठी चाचणी करणे आवश्यक असते. आधीच्या सरकारने म्हणे अशी चाचणी करण्यास मंजुरी दिली नाही. (हे अर्थात तत्कालीन लबाड सत्ताधारी आणि आताचे लाजीरवाणे विरोधक स्वत:च सांगत असतात.) आताच्या सरकारने ती दिली. चाचणी यशस्वी झाल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती देशवासीयांना आणि अर्थातच जगाला दिली... यावरून आता गदारोळ सुरू आहे. आता देशात निवडणुका आहेत. याचवेळी ही घोषणा करण्याचे कारण काय? आधी गेल्या चार वर्षांत हे का नाही केले? आताच करण्याचे कारण काय? नंतर दोन महिने गेल्यावर नसते करता आले का? असे प्रश्न विचारले गेले आणि आताही जात आहेत.
 
त्यावर निवडणूक आयोगाने समितीमार्फत ही बाब तपासली आणि पंतप्रधानांच्या वागण्यात काहीच चूक नाही आणि त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उलंघन केलेले नाही, असा निर्वाळा या समितीने दिला... कायद्याने त्यात काहीच चूक नाही. बेकायदा असे काहीही घडलेले नाही. देशाने एक गौरवास्पद पाऊल टाकले आहे. अंतराळात देशाची ताकद वाढली आहे. हे जगाला सांगण्याची जबाबदारी देशाचा प्रमुख म्हणून पंतप्रधानांची आहे. आता शास्त्रज्ञांनी 2014 मध्येच परवानगी मागितली. त्यामागे वैज्ञानिक कारणे असतील. विद्यमान सरकारने ती दिली आणि मग मिळालेले यशही सरकारने जनतेला सांगितले. याला आता विरोधक नैतिकतेच्या पातळीवर घासून ते गैर असल्याचे सांगत आहेत. यात ‘नरेंड्रींग’ झाले असल्याच्या बोंबा मारत आहेत. आता याआधी असे करण्याचे कुणाला सुचले नाही. तुमच्या हातात संधी असतानाही तुम्ही ते केले नाही अन्‌ यांनी केले म्हणून उगाच आगपाखड करण्यात काय अर्थ आहे?
 
क्रिकेटमधले मकंडींग आणि राजकारणाच्या पटलावरचे हे सारे अगदी मिळतेजुळते आहे. तिकडे क्रिकेटमध्ये गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी त्याच्या बाजूस उभ्या असलेल्या फलंदाजाने त्याची हद्द किंवा क्रीझ सोडली, तर त्याला धावचित करण्याचा नियमाधिष्ठित अधिकार गोलंदाजाला आहे. आता क्रिकेटमध्ये गोरे आणि काळे असे दोन तट आहेत. क्रिकेट हा तसा गोर्‍यांचा खेळ आणि आता त्यावर काळ्यांचेच वर्चस्व आहे. एका श्यामवर्णी खेळाडूने पहिल्यांदा अशा प्रकारे एका गोर्‍या फलंदाजाला बाद करण्याची चलाखी दाखवली, म्हणून गोर्‍यांची सटकली आणि नियमात बसत असल्याचा निर्वाळा देण्यात आल्यावर मग नैतिकतेला समोर करण्यात आले. हे अखिलाडू वृत्तीचे दर्शन आहे, अशी टीका करण्यात आली. अजूनही नियमात बसत असूनही मकंडींगला क्रिकेटमध्ये प्रतिष्ठा नाही. राजकारणातही ते तसेच. आतावर डावेपण उगाच बुद्धीवादी आणि पुरोगामी असल्याचे दाखवित राजकारण करण्यात आले. धर्म, जात यांचा राजकारणासाठी सतत वापर करून घेण्यात आला अन्‌ त्याला धर्मनिरपेक्षता असे नावही देण्यात आले. आता देशाच्या जनतेने पहिल्यांदा पूर्णपणे उजव्यांवर विश्वास टाकला. धर्म, जातीच्या पलीकडे जाऊन ‘सबका साथ, सबका विकास’ हे ध्येयवाक्य सिद्ध करत देशाचा चौफेर विकास केला. आता देश हा जनतेचे, लोकशाहीचे मंदिर आहे आणि तो मजबूत, सुरक्षित करणे म्हणजे कुठे आले अनैतिक? इतकी वर्षे केवळ धर्म आणि जातीच्या भरोशावर राजकारण करणार्‍यांना राष्ट्र हे राजकारणाचा केंद्रिंबदू असू शकते, हे सुचले नाही. मात्र आता ते उजव्यांना सुचले म्हणून ते नेमके कसे अनैतिक आहे, हे सांगण्याचा आटापिटा सुरू आहे. देशाचा विचार करणे, हेच सत्ताधार्‍यांचे काम असते. ते करायलाच हवे. देशासाठी योग्य ते काम करण्याची अशी कुठली वेळ ठरलेली नसते. ते केले याचे कौतुक न करता उलट ते अनैतिक आहे, असे म्हणत त्याला मंकडींग म्हणणे सुरू आहे.
 
मुळात चेंडू टाकला जाण्याच्या आधीच गोलंदाजाच्या बाजूच्या फलंदाजाने असे धावत सुटणे हीच चलाखी आहे. तोच खरा अखिलाडूपणा आहे. म्हणजे समोरच्या फलंदाजाने चेंडू नुसता तटवला तरीही तोवर दुसर्‍या बाजूला फलंदाज चलाखीने अर्धे अंतर पार करून गेलेला असतो. ही बदमाशी झाली. त्यासाठी मग गोलंदाजाच्या धावगतीसोबतच नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाने समोर धावत सुटणे किंवा क्रीझ सोडणे हेच गैर असताना तसे करायचे आणि नियमाने आपण बाद होऊ शकतो, हे माहिती असतानाही तसे करणे म्हणजे मूर्खपणा किंवा शुद्ध बेमुर्वत गुन्हेगारी झाली. क्रिकेटमधले गोरे मात्र आता याची पाठराखण करतात. कायद्याने केलेले कृत्य अनैतिक ठरवितात. आताच्या क्रिकेटमध्ये तर प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे यासाठी जवळपास नियम हे फलंदाजांच्या बाजूूचे आहेत.
 
आयपीएलसारख्या खेळाच्या नावाखाली तद्दन मनोरंजनच असलेल्या प्रकारात तर प्रामाणिक गोलंदाजांचा बकराच बनविला असतो. कॉंग्रेसपद्धतीचे राजकारण हेही अलीकडच्या दशकांत निव्वळ मनोरंजन होत गेले. काम काहीच करायचे नाही अन्‌ वेळेवर जात, धर्म यांच्या नावाने जनतेच्या डोळ्यांत धुळफेक करायची. त्यात मग आताच्या सत्ताधार्‍यांसारखे अगदी निवडणुकीच्या काळांतही राजकारणात लक्ष न देता देशाच्या गंभीर प्रश्नांत लक्ष घालणे यात गैर ते काय? आम्ही आमचे कर्तव्य याही काळात चोख बजावतो आहोत, चौकीदारी नीट करतो आहोत, निव्वळ मतमांग्यांची भूमिका नाही करत, हे जनतेला सांगणे, यात अनैतिक ते कुठले? पण कॉंग्रेसी साहेबांना हे खुपत नाही, पचत नाही!