कर्तबगारांचा केक-वॉक!
   दिनांक :31-Mar-2019
र. श्री. फडनाईक   
 
सतराव्या लोकसभेसाठी दि. ११ एप्रिल रोजी मतदानाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. सात टप्प्यांमध्ये होणार्‍या या मतदानाचा शेवटचा टप्पा १९ मे रोजी संपेल. २३ मे रोजी मतमोजणी व त्याच दिवशी निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होईल. पूर्ण निकाल जाहीर होण्यास कदाचित दुसरा दिवस उजाडेल. निकाल काय लागणार यासाठी खरं म्हणजे २३ मे ची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. मला, तुम्हाला, सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, जनतेला, रावापासून रंकापर्यंत सार्‍या सार्‍यांना, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला, त्याच्या मित्रपक्षांसह चारशेच्या जवळपास जागा मिळणार, हे आजच निश्चित झाले आहे. भाजपा आघाडीच्या उमेदवारांनी विरोधी उमेदवारांना किती लाखांनी भुईसपाट केले तेवढेच जनतेला २३ मे रोजी जाणून घ्यायचे आहे. ही स्थिती निर्माण झाली आहे, ती भाजपाच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारच्या सकारात्मक करारी कर्तृत्वाने आणि विरोधकांच्या नकारात्मक करणीने! 
 
 
विजयासाठी भाजपा आघाडीच्या कर्तव्यतत्परतेला जसे श्रेय देणे आवश्यक आहे, तसे विरोधकांच्या पराभवाला त्यांच्याच अकर्मण्याला जबाबदार धरणे अनिवार्य आहे. विरोधक कर्मिष्ठ राहिलेच नाहीत. कर्तरी प्रयोगात कधी बोललेच नाहीत. जेव्हा तेव्हा पॅसिव्ह व्हॉईस! विधायक विरोध त्यांनी केलाच नाही! सरकारच्या जनहितेच्छु योजनांमध्ये स्वत:च्या काही सुधारणा सांगण्याऐवजी, सूचना देण्याऐवजी, फक्त विरोध केला; त्यासाठी बागुलबुवे उभे केले! अनेक योजनांची खिल्ली उडविली! नोटाबंदी, जीएसटी, मुद्रा योजना, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केलेले प्रयत्न, उज्ज्वला योजना, प्रत्येक खेड्यात वीज पुरविण्याची योजना- अशा अनेक योजनांमध्ये त्यांना सुधारणा सुचविता आल्या असत्या, त्या अधिक व्यवहार्य, अंमलयोग्य, सुलभ करण्यात हातभार लावता आला असता; पण योजनांचे सारे श्रेय सत्ताधारी रालोआला आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांना जाईल, भयाचा हा गंड झाल्याने विरोधकांनी फक्त खोडा घालण्याचे काम केले. प्रत्येक बाबीत मताचे राजकारण पाहिले. प्राधान्य देशाला नाही, समाजाला नाही, स्वत:च्या अस्तित्वाला, ही भूमिका घेतली!
 
संसदेत गोंधळ घातला
संसदेत विरोधकांची कामगिरी केवळ बेकामगिरी राहिली. जेव्हा लोकसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण असायचे, तेव्हा विरोधक आणखी चेकाळायचे! खासदाराची प्रतिष्ठा धुळीला मिळवायचे! ‘यापेक्षा आमचे ग्रामपंचायत सदस्य हजार पटीने बरे’, अशी प्रतिकि‘या, हे प्रसार पाहणार्‍या  ग्रामस्थांची असायची! सभागृहात कागदी विमाने उडवायचे, सभागृहाचे कामकाज सुरू असताना पंतप्रधानांना आलिंगन द्यायचे, आणि नंतर आपल्या जागेवर बसल्यावर, ‘जम गया ना!’ या अर्थाची नेत्रपल्लवी करायची, सत्तारूढ आघाडीच्या सदस्यांच्या भाषणात, जोरजोराने घोषणा देऊन त्यात अशोभनीय अडथळे आणायचे आणि हे सारे करण्यात धन्यता मानायची, हे विरोधकांचे वर्तन सामान्य माणसाला आवडले नाही. खासदारकीचे तनखे यासाठी वाढवून घेतले आहेत का तुम्ही? असा त्यांचा साधा, सरळ प्रश्न होता! ज्यांना संसदेत विचार मांडण्यासाठी पाठविले, ते एकतर खाली मान घालून मौनात गेले असतात, किंवा हातवारे करीत कोलाहल करतात आणि बोलणार्‍यांना नाउमेद करतात, हे चित्र जनतेच्या अपेक्षांना हरताळ फासून गेले! कोलाहल का माजवला जात होता, हे समजण्याइतकी जनतेला निश्चितच अक्कल आहे.
 
जनतेत मिसळलेच नाहीत
या पाच वर्षांच्या काळात विरोधक आपल्या हस्तिदंती मनोर्‍यातून कधी बाहेर पडलेत का? रस्त्यावर आलेत का? मोर्चे काढलेत? सभा घेऊन जनतेचे प्रश्न त्यांनी समजावून घेतलेत? जनतेत कधी मिसळलेत का ते? नोटाबंदीच्या काळात काँग्रेसचा एक प्रमुख नेता आपल्या आलिशान महागड्या गाडीत आला, आणि बँकेसमोरच्या रांगेत आपल्या नोटा बदलण्यासाठी उभा झाला! तो तिथे येणार हे मीडियाला कसे कळले, कोण जाणे! जेव्हा काँग्रेसच्या राजवटीत मिलो व अमेरिकन लाल गव्हासाठी आणि रॉकेलसाठी सुद्धा गरिबांना तासन्‌तास उभे राहावे लागत होते तेव्हा हा नेता लहान होता. वयाने लहान नसता, तर तो तेव्हाही रांगेत उभा झाला असता का? 
 
स्वत:चीच कबर खोदली
तीन तलाक बंदीला विरोध, काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेवर संशय, पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात मॅच फिक्सिंगचा आरोप, बालाकोट हवाई मोहीम फसल्याचा कांगावा, राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिल्यावरही त्यावर रान पेटविणे; या देशासाठी अहोरात्र खपणार्‍या, कोणत्याही प्रकारच्या भ‘ष्ट आचरणाचा शिंतोडा नसलेल्या एका योग्याला ‘चोर चोर’ अशा उलट्या बोंबा मारणे- या बाबी पोरकटपणाचा प्रत्यय देतात, परिपक्वतेच्या नाहीत, राष्ट्राप्रति संवेदनशील नाहीतच नाहीत!
वातानुकूलित दालनात पत्र-परिषदा घेऊन खोटेनाटे आरोप करण्यापर्यंतच विरोधकांची जबाबदारी सीमित आहे का? निवडणुकीच्या काळात, असतील नसतील तेवढ्या मंदिरांत जाऊन पूजाअर्चा करण्यानेच त्यांची कर्तव्यपूर्ती होते का? कोणता लढा दिला विरोधकांनी या काळात? सरकारच्या चांगल्या कामात खीळ घालण्यातच धन्यता मानणार्‍या विरोधकांनी स्वत:ची राजकीय कबर स्वत:च खोदून ठेवली आहे. जनता त्यावर फक्त माती टाकणार आहे!
 
विकासाची बुलेट ट्रेन
एकीकडे हे शोकगीत, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी सरकारची दुंदुभीच्या निनादात निघालेली आणि जनकल्याणाचे एकामागून एक टप्पे गाठणारी बुलेट ट्रेन! नरेंद्र मोदी नावाचा सुपरमॅन या देशाला भक्कम करीत आहे, संपन्न करीत आहे, त्याची सार्‍या विश्वात इज्जत वाढवीत आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या देशाला तंत्रसिद्ध करीत आहे, स्वावलंबनाचा मंत्र देऊन देशाला स्वत:च्या पायावर मजबूतपणे उभा करीत आहे, भ्रष्टाचाराच्या बीमोडासाठी भल्याभल्यांच्या नाकदुर्‍या काढत आहे, तथाकथित संभावितांचे बुरखे फाडतो आहे, या देशातल्या प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा मिळावा यासाठी दिवसरात्र कष्ट उपसत आहे, आपल्या पदाचा कोणत्याही प्रकारचा लाभ ना स्वत: घेत आहे, ना आपल्या परिवारजनांना देत आहे, दहशतवाद्यांच्या हात धुऊन मागे लागला आहे, जनतेत परमेश्वराचे रूप पाहून तिची पूजा बांधीत आहे, सर्वांची साथ घेऊन सर्वांचा विकास करण्याची प्रामाणिक तपश्चर्या करीत आहे, शत्रूराष्ट्राला त्याची हैसियत दाखवीत आहे, दाखविली आहे आणि त्या देशाची मुजोरी, मस्ती जिरविली आहे, या देशाला लुटणार्‍या ठगांना धुंडाळून त्यांच्या मुसक्या आवळत आहे, आधीच्या सरकारांचे घोटाळे उजेडात आणत आहे; थोडक्यात या देशासाठी समर्पित आहे, झिजतो आहे, क्षणाचीही उसंत न घेता कष्ट उपसतो आहे. गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींनी ना स्वत: सुटी घेतली ना इतरांना घेऊ दिली. मेडिकल लीव्ह हा त्याला अनिवार्य अपवाद! अनंतकुमार आणि पर्रीकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यातही काम केले! अरुण जेटली औषधोपचार घेऊन इस्पितळातून सुटी मिळताच दुप्पट जोमाने कामाला भिडतात! अशी फौज उभी केली आहे मोदींनी! अशी कळकळ विरोधकांपैकी किती जणांनी दाखविली. अशी व्हिजन, अशी पॅशन, अशी ॲक्शन, अशी डिक्शन दाखविली कोणी? त्याऐवजी केवळ फिक्शन फैलावल्या! जमेला विधायक असं एकही कृत्य नव्हतं, त्यामुळे शिव्याशाप देण्याचा उपद्व्याप विरोधकांपैकी काहींनी सुरू केला. तसे करताना देशाचाच उपमर्द होत आहे, हे दिसत असूनही तो सुरू ठेवला. स्वत:चे अस्तित्व टिकविण्याची ती केविलवाणी धडपड होती!
 
लघुतम आघाडी
१८८५ साली स्थापन झालेल्या पक्षाला आपण पांगळे झाल्याचे लक्षात आले. आव केवढाही आणला, आवेश केवढाही दाखवला, तरी अगतिकता अभिव्यक्त होतेच! जनतेच्या काँक्रीट पिलर्सवर दिमाखाने उभा असलेला बुरूज, जोपर्यंत त्यावरचा खडा पहारा हटविला जात नाही, तोपर्यंत त्याच्या आसपासही फिरकणे आपल्याला शक्य नाही, हे वास्तव लक्षात आल्यावर, ज्यांना, जळी स्थळी काष्ठी पाषाणी चौकीदार दिसत होता, त्या समदु:खीपुढे हस्तांदोलनासाठी या ‘नॅशनल’ पक्षाने हात पसरविणे सुरू केले! सपा, बसपा, पीडीपी, बिजू जनता दल, टीडीपी, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष या पक्षांनी तो झिडकारला! राजद, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी, सुरक्षित अंतरावरून आणि आपले वर्चस्व राखून हातावर चापटी मारल्यासारखे करून तो स्वीकारल्या न स्वीकारल्यासारखा स्वीकारला; महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीनेही अद्याप तरी त्या पक्षाला प्रतिसाद दिला नाही. सारांश हा, की ज्यांनी एकमेकांत आपले हात गुंफले होते आणि मोठ्या जोशात उंचावले होते, ते त्यांनी आता मोकळे करून घेतले आहेत आणि ‘महाआघाडी’ म्हणून जिचा डांगोरा पिटविला होता, ती आता लघुतम आघाडी झाली आहे. त्यात नवलही नाही! असे ‘थर्ड फर्स्ट’ या आधी दर निवडणुकीत पुढे आले अन्‌ मागे गेले! तात्पर्य हेच, की विरोधकांना मोदींना पर्याय उभा करता आला नाही! हेवीवेट चॅम्पियनला, कोणताही नियमित व्यायाम न घेणारे चार-दोन फेदरवेट एकत्र येऊनही, ‘जमिनीवर’ भक्कमपणे रोवलेले चॅम्पियनचे पाय इंचभरही हालवू शकत नाही, हे पुन: एकदा स्पष्ट झाले!
 
निवडणुकीनंतर भाजपाविरोधी शक्ती (!) एकत्र येणार, अशी आता झिडकारित काँग्रेस म्हणत आहे. अनिवार्यतेमुळे या शक्ती निवडणुकीपूर्वी जवळ येऊ शकल्या नाहीत, मात्र राज्याभिषेकाच्या वेळी, निसटलेल्या सर्व कड्या वेल्ड करून आम्ही ‘ॲण्टी बीजेपी चेन’ तयार करू, या खोट्या आशावादावर काँग्रेस तग धरून आहे. पराभवाने धास्तावलेला पक्ष कशात तरी समाधान शोधतो. हा त्यातलाच प्रकार!
 
जबाबदारीशी फारकत
येणेप्रमाणे विरोधकांनी आपल्या जबाबदारीशी फारकत घेतल्याने, भाजपा आघाडीच्या विजयाचा मार्ग फारच सुलभ झाला आहे. फलंदाज आणि गोलंदाज यांची मजबूत फळी असलेली भाजपा आघाडी पाच वर्षांपासून जनतेच्या कामासाठी चौफेर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणारी आणि देशाच्या जेतेपदाची आस लावून बसलेल्या प्रेक्षकांच्या आशा-आकांक्षाची पूर्ती करणारी आधीपासूनच भक्कम असलेली ही आघाडी आहे. ती िंजकणारच आहे, पण तिला जो ‘केक-वॉक’ मिळणार आहे, तो विरोधकांच्या नाकर्तेपणामुळे, संकुचित विचारामुळे, स्वत:च्या अस्तित्वासाठी देशालाही दुय्यम स्थान देण्याच्या प्रवृत्तीमुळे आणि अर्थातच क्षमतेचे न्यून असल्याने! तसाही, कर्तबगारासाठी प्रत्येक ‘वॉक’ ‘केक-वॉक’च नसतो का!
 
एका पारड्यात भाजपा नेतृत्वाखालील नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट (एनडीए)ची भारदस्त कामगिरी आणि दुसर्‍या पारड्यात विरोधकांचा पोकळ बोभाटा. तराजूला कोणी कितीही झोके देण्याचा प्रयत्न केला, तरी भाजपाचे पारडे जागचे हालणार नाही, तसूभरही नाही!
 
आपल्या पाच वर्षांच्या पहिल्याच ‘इिंनग’मध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आघाडीच्या फलंदाजांनी, जनतेने दिलेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर कामगिरीच्या धावांचा डोंगर उभा केला आहे. आता प्रतिस्पर्ध्यांना किती धावांत गुंडाळायचे हे गोलंदाजांची जबाबदारी सांभाळणार्‍या बूथ कार्यकर्त्यांच्या हाती आहे. या गोलंदाजांनी, उद्दिष्ट साध्य होईपर्यंत आणि त्यानंतरही सतर्क, सजग, सावध राहून सातत्याने सामान्यांच्या समस्या सोडविण्यात अग‘भागी राहायचे आहे. खरे मॅच विनर तेच आहेत! सरकार आणि जनता यांच्यातला महत्त्वाचा दुवा असणार्‍या बूथ कार्यकर्त्यांनो, देशाचे ‘भले’ घरोघरी पोहचवा! केक आणखी सॉफ्ट होईल!