केतकी करणार बिग बॉसच्या घरात प्रवेश ?
   दिनांक :31-Mar-2019
 
 ‘बिग बॉस’च्या पहिल्या मराठी पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच ‘बिग बॉस मराठी २’ सुरू होणार आहे. अंतर्गत कलहामुळे लोकप्रियता वाढलेल्या या शोच्या यंदाच्या पर्वात कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेता शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर यांच्या नावांसोबतच गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे.  परंतु केतकीने मात्र या चर्चेला दुजोरा दिला नसल्याचे कळते. यासंदर्भात इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने एक पोस्ट लिहिली आहे.
 

 
 
 
इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये केतकीने लिहिले, ‘बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. मलासुद्धा बिग बॉस पाहायला खूप आवडतं आणि मीसुद्धा दुसऱ्या पर्वासाठी खूप उत्सुक आहे. मी बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. पण ही फक्त अफवा आहे. या वर्षी माझा असा कोणताच प्लॅन नाही. पण या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.’