मोदी है तो मुमकीन है!
   दिनांक :31-Mar-2019
मंथन 
 
भाऊ तोरसेकर  
 
 
 कुठे आघाड्या होऊ शकतात आणि कुठे जागावाटपात अधिक जागा कॉंग्रेस मागू शकते; त्याची माथेफ़ोड करण्यासाठी कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. तिथे जमलेले एकामागून एक ज्येष्ठ नेते श्रेष्ठी कपाळाला हात लावून बसलेले होते. राहुल गांधींनी मागल्या कित्येक महिन्यापासून उडवलेले पतंग एकामागून एक कापले गेल्याने अवघी कार्यकारिणी अस्वस्थ झालेली होती. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आणि तरीही कुठे उमेदवार निश्चित करता येत नाहीत, म्हणून माजी पंतप्रधान मनमोहन सिंह कपाळाला हात लावून बसलेले होते. पलिकडे बसलेले चिदंबरम्‌ त्यांना म्हणाले, सर तुम्ही नशिबवान आहात, कारण शीखधर्मिय आहात. त्यावर आशंकित चेहर्‍याने मनमोहन त्यांच्याकडे बघू लागले. तर चिदंबरम्‌ उत्तरले, तुमच्या डोक्याला कसला ताप नाही! पुन्हा मनमोहन शंकाकुल झाले? त्यामुळे चिदंबरम्‌ना खुलासा करावा लागला, तुमच्या माथ्यावर फ़ेटा आहे. आम्हाला डोकेच आपटावे किंवा खाजवावे लागतेय आणि तुमचे डोके फेट्यामुळे शाबूत आहे. फेटा खाजवून तुम्ही सुरक्षित आहात. पक्षाध्यक्षांनी आमच्यावर मात्र डोके भिंतीवर आपटण्याची वेळ आणलेली आहे. हे 72 हजार रुपये कुठून आणायचे आता? त्या उत्तराने मनमोहन समाधानी झाले आणि पुन्हा फेटा खाजवू लागले. अकस्मात राहुल गांधींनी प्रत्येक गरीब कुटुंबाला 72 हजार रुपये खात्यात देण्याची घोषणा करून टाकली आणि जुन्याजाणत्या कॉंग्रेस नेत्यांची अशी घालमेल चालू होती. इतक्यात आपल्या पांढर्‍याशुभ्र भुवयांना पिळ देत ख्यातनाम वकील कपिल सिब्बल बैठकीच्या खोलीत आले. त्यांचा चेहरा पडलेला होता आणि म्हणूनच सदाप्रसन्न मनीष तिवारींकडे सगळ्यांच्या प्रश्नार्थक मुद्रा वळल्या. निवडणूक आयोगाकडे मोदी विरोधात केलेल्या ताज्या तक्रारीचा निकाल घेऊन दोघे बैठकीला आलेले होते. तिथेही थप्पड बसल्याची ब्रेिंकग न्यूज त्यांचे चेहरेच देत होते.
 

 
 
अवकाशातला उपग्रह क्षेपणास्त्राने पाडण्याचे तंत्र यशस्वी केल्याची घोषणा पंतप्रधान म्हणून मोदींनी केल्यामुळे राहुलची 72 हजार रुपयांची योजना उद्ध्वस्त झाली होती. ती वाचवण्यासाठीच हे दोघे नामवंत वकील आयोगात तक्रार घेऊन गेलेले होते. आचारसंहिता लागलेली असताना पंतप्रधान देशाला उद्देशून अशी घोषणा कशी करतात? तो आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार त्यांनीच केली होती. तिलाही आयोगाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. म्हणून ते दोघे बेचैन होते. जिथे म्हणून सापळा लावावा किंवा जाळे टाकावे, त्यातून हा मोदी अलगद कसा निसटतो? त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने ही अवघी कार्यकारिणी रडकुंडीला आलेली होती. पण अजून राहुल किंवा प्रियंकाचा पत्ता नव्हता. त्यामुळे दबल्या आवाजात त्यांच्यात चर्चा चालली होती. इतक्यात कुणीतरी म्हणाले, पंतप्रधानाने तशी घोषणा करायला हरकत नव्हती. पण त्यात नेहरूंमुळे हे शक्य झाल्याचे सांगायला हवे होते. शास्त्रज्ञ वा वैज्ञानिक भारतातही सापडू शकतात, अशी डिस्कव्हरी पंडितजींनी आपल्या पुस्तकात केलेली होती. म्हणूनच पुढे भारतात वैज्ञानिक संशोधन सुरू झाले. त्यापूर्वी भारतामध्ये सी. व्ही. रामन, विक्रम साराभाई, होमी भाभा वगैरे भोंदू लोक विज्ञानाची भजी वडे तळत असल्याचे इतिहासात नमूद असल्याचेही सुरजेवालांनी कथन केले, तेव्हा उपस्थितांचे चेहरे खुलले. सहाजिकच मुद्दा पुन्हा एकदा आगामी लोकसभेच्या निवडणूक जाहीरनाम्याकडे आला आणि त्यात प्रत्येक कुटुंबाला 72 हजार कोटी कुठून द्यायचे, याविषयी चर्चा सुरू झाली. पुन्हा चिदंबरम्‌ विरळ केसातून हात फिरवित डोके खाजवू लागले. कारण पत्रकर परिषदेत राहुलनी त्याविषयीचा खुलासा चिदंबरम्‌ देतील, असे जाहीर करून टाकलेले होते. पण तितकी म्हणजे साडेतीन लाख कोटी रुपयांची रक्कम कुठूनही जमा होत नव्हती, अगदी कार्तिने दडवलेली वा रॉबर्ट वाड्राच्या खात्यातली आणि नॅशनल हेराल्डमधून आलेल्या रकमा एकत्र करूनही तितकी रक्कम दिसत नव्हती. म्हणून चिदंबरम्‌ हैराण होते.
इतक्यात सुरजेवाला म्हणाले चिंता करू नका, आपण प्रियंका वाड्रांना त्याचे उत्तर शोधायला सांगू. किंवा विजय मल्ल्याकडून काही रक्कम उधार घेऊ. अशी उलटसुलट चर्चा रंगलेली असतानाच नवे दोन मुख्यमंत्री बैठकीत दाखल झाले. कमलनाथ आणि गेहलोत यांचे उपस्थितांनी स्वागत केले आणि पुन्हा सगळे खाली बसले. सर्वांचे चिंताक्रांत चेहरे बघून कमलनाथांनी आपला सदरा झटकला. त्यांना कुणीतरी 72 हजार रु. खात्यात जमा करण्याची समस्या कथन केली, तेव्हा मुख्यमंत्री खळाळून हसले. त्यात काय मोठे? आम्ही असे हजारो लाखो रुपये कर्ज माफ करून शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा केले, तीच प्रणाली वापरूया. तिथे रोकड वा रक्कम आवश्यक नाही. अगदी सोपे काम आहे. तुमच्यापाशी नुसता मोबाईल असला म्हणजे झाले. बाकीचे अर्थशास्त्री पाहतील. श्रेष्ठी चक्रावून कमलनाथांकडे आदराने बघू लागले. इतका वेळ अर्थसंकल्प व रिझर्व्ह बँक असला काथ्याकूट करीत बसलेल्या चिदंबरम्‌ व मनमोहन यांच्या चेहर्‍यावरचे नवल लपत नव्हते. त्यांनीही प्रश्नार्थक मुद्रेने कमलनाथांकडे पाहिले, तर त्यांनी खिशातून मोबाईल काढला आणि त्यातला एक मेसेज सर्वांना दाखवला. विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळाल्यावर दहा दिवसात कर्जमाफीचे आश्वासन राहुलनी दिले होते. आम्ही तसा निर्णय दहा दिवसात घेतला आणि अजून एक छदामही लोकांना दिलेला नाही. दिले फक्त मेसेज! बाकीच्यांनी त्या मोबाईलवर झडप घातली व संदेश वाचला. त्यात म्हटले होते, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असल्याने आता मतदान संपल्यावरच खात्यात पैसे जमा होतील. ही कल्पना सर्वांना खूप आवडली. पण चिदंबरम्‌ शंकाकुल झाले. मतदान संपून आपले सरकार आले तर पुढे काय? कमलनाथ म्हणाले, ही शेवटची निवडणूक थोडीच आहे? देशात कुठेना कुठे निवडणूका सतत चालू असतात. मग एक मतदान संपल्यावर पुढल्या मतदानापर्यंत गप्प बसायचे आणि आचारसंहिता लागली, की हाच संदेश धाडायचा. डोक्याला कसला ताप नाही की पैसे जमवण्याची झिगझिग नाही. अकस्मात बाहेर गडबड झाली, सगळे तिकडे बघू लागले.
राहुलजी आलेले होते. त्यांचा प्रवेश होताच सगळे ज्येष्ठ-श्रेष्ठ उठून ताडकन उभे राहिले आणि कंबरेत वाकून कुर्निसात केला. हसतमुख राहुलना सर्वांचे चिंताग्रस्त चेहरे बघूनही हसूच आले. कसली समस्या आहे? तेव्हा आधी कोणाची बोलायची हिम्मत  नव्हती. पण सुरजेवालांनी धाडस केले आणि 72 हजाराचा विषय काढला, तेव्हा इतरांना धीर आला. प्रत्येक कुटुंबाला 72 हजार म्हणजे साडेतीन लाख कोटी आणायचे कुठून? चिंदबरमनी दबल्या आवाजात प्रश्न केला. तेव्हा राहुल गांधींसोबत आलेले पित्रोडा उत्तरले, फार मोठे काम नाही. मोदी आधारकार्डाला जोडून असलेल्या खात्यात पैसे जमा करतात ना? आपण नीलकेणीला हाताशी धरून एक नवे ओळखपत्र गरिबांसाठी सुरू करायचे. त्याचे नाव असेल उधारकार्ड! त्यात गरिबालाच नव्हेतर कोणालाही हवी तितकी रक्कम सरकारने द्यायची. फक्त ही रक्कम रोखीतली नसेल, दलाल नकोत म्हणून हे उधारकार्ड खूप महत्वाचे ठरेल. त्यात सरकार जमा करील ती रक्कम सरकारच्या माथी उधारी म्हणून बसेल. सरकार त्या नागरिकाचे आपल्याकडे देणे असल्याचे मान्य करीत असल्याची ती पावती असेल. रक्कम द्यायला नको की अर्थसंकल्पात तरतूदही करायचे काही कारण नाही. राहुलची योजना यशस्वी करण्याचा हा सोपा आणि डिजिटल उपाय आहे. इतका वेळ हसत सहकार्‍यांचे ऐकणारे राहुल एकदम चिडले आणि म्हणाले गप्प बसा. तुमची डोकी चालली असती, तर मागल्या लोकसभेत आपण सत्ता गमावली नसती की मोदी बहुमताने निवडून आले नसते. तुमच्या भरवशावर मी आगामी लोकसभा लढवित नाही की कॉंग्रेसचे भविष्य अवलंबून नाही. तुमच्यापेक्षा माझा मोदींवर अधिक विश्वास आहे. योजना घोषित केली, तेव्हाही अशी 72 हजार प्रत्येकी वाटण्याची योजना अशक्य कोटीतली आहे, हे मला पक्के ठाऊक होते. पण मी घोषित केली, कारण तुमच्यापेक्षा माझा मोदींवर विश्वास होता आणि जनतेचाही आहे. चकित होऊन तमाम कॉग्रेसश्रेष्ठी राहुलकडे बघू लागले. तर हाताची मूठ वळून राहुल उद्गारले, हमे जो नामुमकीन है, वह सबकुछ; मोदी है तो मुमकीन है...