एअर स्ट्राइकमध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवादी ठार - अमित शाह यांचे वक्तव्य
   दिनांक :04-Mar-2019
भारताने पाकिस्तानातील बालकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला आहे. रविवारी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.

 
 
उरी हल्ल्यानंतर लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्तक असल्याने सर्जिकल स्ट्राइक होणार नाही असे लोक म्हणत होते. पण नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाने तेराव्या दिवशीच एअर स्ट्राईक झाला. यामध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले, असे शाह म्हणाले. 
 
 
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या हाती लागल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारचा प्रभाव इतका होता की, ४८ तासांच्या आत त्यांची सुटका करावी लागली. इतक्या कमी वेळात सुटका होण्याची जगातील ही पहिली घटना होती असे अमित शाह म्हणाले. अमेरिका आणि इस्त्रायल नंतर सैन्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेणारा भारत हा जगातील तिसरा देश आहे असे ते म्हणाले.
एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन विरोधी पक्ष पाकिस्तानला संधी देत आहेत. ममता बॅनर्जींनी एअर स्ट्राइकचे पुरावे मागितले. विरोधी पक्षातील नेत्यांच्या विधानामुळे पाकिस्तानच्या चेहऱ्यावर हास्य फुलत आहे. तुम्ही मोदी सरकार आणि सैन्याच्या पाठिमागे उभे राहू शकत नसाल तर कमीत कमी शांत राहा असे अमित शाह सूरत येथील एका कार्यक्रमात म्हणाले.