कुणी पुरावे देता का हो पुरावे...
   दिनांक :04-Mar-2019
 
 
सध्या देशात जबरदस्त माहौल आहे. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. त्यानंतर विमानांची घुसाघुसी आणि विंग कमांडर अभिनंदनचे पकडले जाणे... पाकिस्तानकडून डझनभर खोटी माहिती देणे आणि अखेर बिंग फुटल्यानंतर शेपूट घालून बसणे, हे सर्व झाले. अभिनंदन यांना दोन दिवसांत मुक्त करण्यासही नापाक पंतप्रधान इमरान खान बाध्य झाले. ही सगळी प्रक्रिया सुरू असताना, पंतप्रधान मोदी मात्र निश्चिंत होते आणि तिकडे नापाक पंतप्रधान इमरान खानसह सारा पाकिस्तान चिंतीत होता. भारत पाकिस्तानवर आक्रमण करणार का? आपले कसे होणार? खायला अन्न नाही, पिण्याला पाणी नाही, भाजीपाला आणि पेट्रोल महाग. तिकडे त्यांचा नापाक लष्करप्रमुख विचार करीत होता. सैन्याला किती दिवस रसद पुरणार? भारताने युद्ध जिंकले तर? आपली तर जगात नाचक्की होईल. म्हणजे जी काय एकदोन टक्का आहे, ती पण धुळीस मिळणार.
 

 
 
तिकडे अमेरिका, फ्रान्स, रशिया, ब्रिटन डोळे वटारून पाहात आहे. जागतिक इस्लामी संघटना भारताला सन्माननीय पाहुणा म्हणून बोलावीत आहे. सुषमा स्वराज यांचे भाषण होणार, पाकिस्तानचे वस्त्रहरण करणार, या कल्पनेनेच इमरान आणि बाजवाच्या छातीत धस्स झाले. आता करावे तरी काय? बाजवा तर जाम खवळलेला. अभिनंदनला सोडलेच कशाला? असा त्याचा प्रश्न होता. तिकडे नापाक संसदेत शेम शेमचे नारे दिले जात होते. स्वपक्षीय, इमरान आणि बाजवाचेच वस्त्रहरण करीत होते. वाहिन्या इमरानवर आग ओकत होत्या. जगभरातील प्रमुख वाहिन्या पाकिस्तानच्या दहशतवादावर कार्यक्रम दाखवीत होत्या. काय हे दिवस आले! जगातील एकही देश पाकिस्तानच्या बाजूने नाही, उलट आपल्यालाच नालायक ठरवीत आहेत. त्यापेक्षा काही दिवस शांत राहणेच उत्तम. पण, काहीतरी नापाक हरकत करायलाच हवी.
 
मग भारताच्या हद्दीतील नागरिकांवरच हल्ले करा. तोच एक उपाय आहे म्हणून हल्ले सुरू झाले. आता यावर मोदी खवळले तर काय होईल, याचा विचारही इमरान आणि बाजवाने केला असणारच. सारे कसे जगभरात पुराव्यानिशी सुरू होते. जैशने जबाबदारी घेतल्यापासून तर नापाक पंतप्रधान इमरान खान यांनी संसदेत, विंग कमांडर अभिनंदन यांना मुक्त करण्याच्या घोषणेपर्यंत सारे काही जिवंत पुरावे समोर होते. त्यामुळे भारतातील विरोधकांना मोठीच चिंता पडली. तिकडे टुकडे गँगचे समर्थक, बुद्धिजीवी आणि काही नापाक पत्रकारांनी नरक ओकलेच. आता त्यांना नरकातच राहण्याची सवय झाली, त्याला तुम्ही आम्ही काय करणार? पण, अचानक झोपेतून उठल्यानंतर एखादे लहान बाळ जोरजोराने रडते, किंचाळते तसे ममतादीदींचे झाले. भारताने खरंच पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केल्याचे पुरावे सरकारने द्यावेत, अशी मागणीच त्यांनी करून टाकली. तिकडे वाचाळवीर दिग्विजयिंसह हेही बरळले. म्हणाले, पुरावे द्या. अरे, अशा वेळी चूप बसायचे ना. पण, ते चूप कसे बसणार? त्यांच्या पायाखालची वाळू आधीच सरकायला लागली होती.
 
अमित शाह आणि नरेंद्र मोदींच्या दणदणीत सभांनी त्यांची आधीच झोप उडून गेली असताना, त्यात आणखी आगीत तेल. साध्या कुत्र्यानेही त्यांच्या या विधानाची दखल घेतली नाही. दस्तुरखुद्द पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, भारतीय विमाने पाकिस्तानच्या हद्दीत आली, बालाकोटवर बॉम्ब टाकले, मदरसे उद्ध्वस्त केले आणि आपली वायुसेना झोपली होती. झोपेवरून आठवले, पाकच्याच मंत्र्याने सांगितले की, पहाटेच्या साखरझोपेत असल्यामुळे काय झाले काही कळले नाही. आम्हाला वाटले, आमचीच विमाने आहेत. तरीही ममताला पुरावे हवेत. किती हा नीचपणा. बरे, ममताच काय, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, तो अरुण शौरी यांचा आपल्या लष्करावर भरवसा नाही, हे पहिल्याच सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस लक्षात आले होते. लष्कराविरुद्ध असेच विधान त्यांनी इस्रायल किंवा पाकिस्तानात जाऊन करण्याची हिंमत दाखवली असती, तर मरेपर्यंत त्यांचे तोंड भारताला दिसले नसते. पण, यांचा उद्देश एकच. मोदी आणि लष्कराला बदनाम करण्याचा. सारा देश यांच्या नापाक कारवाया आणि विधाने पाहात आहे, ऐकत आहे आणि यांच्या तोेंडावर थुंकत आहे. तरीही यांना लाजलज्जा नाही. दहा-बारा लोकांच्या विरोधामुळे लष्कराचा बालही बाका होणार नाही. कारण, 130 कोटी जनता आज लष्करासोबत आहे.
 
 सुपारी पत्रकारितेचा प्रारंभ करणारे अरुण शौरी, विरोधकांचे मुडदे पाडणार्‍या ममता बॅनर्जी आणि कॉंग्रेसने माझ्यासोबत युती करावी यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांसमोर लोटांगण घालणारे अरविंद केजरीवाल हेही देशासमोर आहे. आपली युती व्हावी म्हणून मी कॉंग्रेस नेत्यांना सांगून सांगून थकून गेलो, असे स्वत: सांगणारे अरविंद केजरीवाल माहीत आहे काय म्हणाले होते? ‘‘मुझे मेरे बच्चे की कसम, जिंदगी मे कभी कॉंग्रेस के साथ नही जाऊंगा...’’ ते आता मोदींना सल्ला देत आहेत, लष्करावर राजकारण नको. अरे मूर्ख माणसा, एकीकडे तुमचा लष्करावर विश्वास नाही. दुसरीकडे लष्करावर राजकारण करू नका म्हणता. खरी गोष्ट ही आहे की, लष्कराने पाकिस्तानात घुसून केलेला हल्ला आणि दोनच दिवसात विंग कमांडर अभिनंदनचे मायदेशी परतणे, या दोन्ही बाबीत नरेंद्र मोदी यशस्वी झाल्यामुळे देशात जे राष्ट्रवादाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यांना अशी भीती वाटते की, 2014 सारखीच मोदीलाट देशात येऊ शकते.
 
असे घडले तर मग आपले काय होणार? म्हणून ते आता विकाऊ पत्रकारांची साथ घेऊन मोदींवर नवे आरोप शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेही सोशल मीडियावरील वातावरण पाहिले, तर सध्या विरोधकांचे कुणीही ऐकायला तयार नाही. युवावर्ग राष्ट्रप्रेमाने न्हाऊन निघाला आहे. लोक पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान हवेत, असे खुल्लमखुल्ला म्हणत आहेत. जनमानस असे का बोलत आहे? त्यांचा विचार पक्का आहे. असे का घडावे, याचा विचार विरोधकांनी शांतपणे करायला हवा. देशाची सुरक्षा अक्षुण्ण राखण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते, लष्कराबद्दल सन्मान असावा लागतो, त्यांना कारवाई करण्याची पूर्णपणे मोकळीक द्यावी लागते. हे गुण विरोधकांनी मोदींपासून शिकण्याची गरज आहे. लष्कराबद्दल जी देशभरात आज आदराची भावना निर्माण झाली ती मोदींमुळे, हे त्यांनी विसरू नये. निवडणुका येतील आणि जातील, सरकारेही येतील आणि जातील, पण देश सुरक्षित असला पाहिजे.
 
त्यासाठी लष्कराचा सन्मान राखणे गरजेचे आहे. तो मोदींनी राखला. संधी तर कॉंग्रेसलाही होती. पण, त्यांनी मग बोटचेपी भूमिका का घेतली? मुंबईवर हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून त्यांना कुणी रोखले होते? चीनने आपली प्रचंड भूमी कशी काय हडप केली? पाकिस्तानकडून जिंकलेला  प्रदेश आम्ही परत का केला? 1971 च्या भारतीय युद्धबंदींना सोडण्याआधीच आम्ही शरण आलेल्या 93 हजार पाकिस्तानी सैनिकांना कसे काय सोडून दिले? असे अनेक प्रश्न आहेत. काश्मीर प्रश्न ‘युनो’त नेहरूंनी नेला नसता, तर आज एवढ्या समस्या उद्भवल्याच नसत्या. याद राखा, प्रश्न तुम्हालाही विचारले जाऊ शकतात. आज मोदींनी जे करून दाखविले, त्याचे मुख्य कारण म्हणजे सारा देश त्यांच्यामागे ठामपणे उभा होता. अजूनही वेळ गेलेली नाही. अन्यथा, लोकांच्या भावना तुम्हाला दिसत आहेतच...