या बायोपिकसाठी आलिया चढणार माउंट एव्हरेस्ट !
   दिनांक :04-Mar-2019
सध्या चित्रपट क्षेत्रात बायोपिक  सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची चलती आहे. अश्यातच अरुणिमा सिन्हा यांच्या जीवनावर आधारित एका बायोपिकचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे.
 

 
 
या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट अरुणिमा यांची भूमिका साकारणार आहे. ज्यांना अरुणिमा यांच्या जीवन संघर्षाबद्दल माहिती नसेल त्यांना सांगू इच्छितो की, २३ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू असलेली अरुणिमा १२ एप्रिल २०११ ला दिल्लीला नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाली होती. लखनौ येथून ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये साध्या डब्यात चढली. रात्री काही तरुण हातात चाकू घेऊन डब्यात घुसले. सगळयांना धमकावून जे मिळेल ते लुटू लागले. कोणत्याही प्रवाशाने विरोध केला नाही. अरुणिमाच्या गळ्यात सोन्याची साखळी होती. दरोडेखोर तिच्याजवळ आले. एकाने तिला साखळी देण्यासाठी दरडावले. दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला. तिने विरोध केला. एकाने तिच्या पोटावर लाथ मारली. तिच्या गळ्यातील साखळी ओढून घेतली. कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करते आहे हे पाहून त्या दरोडेखोरांनी भरधाव रेल्वेगाडीमधून तिला ओढत दरवाज्यापाशी नेले आणि बाहेर ढकलून दिले. कंबरेपासून पायाचे हाड मोडले. ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वेमार्ग होता. दुस-या ट्रॅकवरील रुळांवर तिचा पाय होता. तिने उठायचा प्रयत्न केला. पण ती उठू शकली नाही. पाय हलत नव्हता. समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती. ती तिच्या पायांवरून गेली. रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळांखालील उंदीर तिचे पाय, केस कुरतडत होते. रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेह-यावर, अंगावर पडत होते. सकाळी कोणालातरी ती दयनीय अवस्थेत ट्रॅकवर पडलेली दिसली. एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आले आहे. हे तिला जाणवले. तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला. त्यामुळे तिची व्हॉलीबॉलमधील कारकीर्द संपुष्टात येणार होती. भूल द्यायची सुविधा उपलब्ध नसल्याने तशाच परिस्थितीत तिचा पाय कापण्यात आला.
या घटनाक्रमात अरुणिमाने आपले मनोधैर्य गमावले नाही. याउलट तिने आपला कृत्रिम पाय घेऊन सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचे नक्की केले आणि अशक्य ते शक्य करून दाखवले.
 
अरुणिमा सिन्हा यांचा हा जीवन संघर्ष अत्यंत प्रेरणादायी असून, हा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांसमोर येईल.