पाकिस्तानी कलाकारांवर बंदी योग्य -रणवीर सिंह
   दिनांक :04-Mar-2019
पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. देशातील प्रत्येक नागरिकाने या घटनेचा तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला. इतकचं नाही तर सिनेसृष्टीनेदेखील या हल्ल्यानंतर कठोर निर्णय घेत पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा मागणी केली. या मागणीचं अनेक कलाकारांनी समर्थन केलं आहे, तर काहींनी प्रतिक्रियाच देणं टाळलं आहे. या साऱ्यामध्ये अभिनेता रणवीर सिंहने मात्र ‘कलेच्या आणि राजकारणाच्या सीमा वेगळ्या असायला हव्यात’, असं म्हटलं आहे.
 
 
१४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतानेही पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच पाकिस्तानसोबतच्या व्यापारवर निर्बंधही लादण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी भारतातील सिनेअसोसिएशननेही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याविषयी बोलताना रणवीरने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असावी अशी जर शहीद जवानांच्या कुटुंबियांना इच्छा असेल तर माझा त्यांना पाठिंबा असल्याचं म्हणाला.
 
राजकारणाला देशाच्या सीमा असतात. मात्र या सीमा कला किंवा क्रीडा क्षेत्राला नसतात. त्यामुळे राजकारणाला कधीही कला किंवा क्रीडा क्षेत्राशी जोडू नये. कला, क्रीडा आणि राजकरण या गोष्टी कायम वेगळ्या ठेवायला हव्यात. पण जर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असावी ही शहीद जवानांच्या कुटुंबियांची मागणी असेल तर मी या बंदीला कधीच विरोध करणार नाही, असं रणवीर म्हणाला. दरम्यान, या हल्ल्यानंतर अनेक भारतीय दिग्दर्शकांनी पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सलमान खाननेही आतिफ अस्लमनं गायलेलं गाणं दुसऱ्या भारतीय गायकाला गायला लावलं.