स्वःताचेच सरण रचून शेतकऱ्याने केली आत्महत्त्या
   दिनांक :04-Mar-2019
 
नागपूर : आजारपण आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून नरखेड तालुक्यातील मदना गावातील वृद्ध शेतकऱ्याने स्वतःचेच सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ८५ वर्षीय गोपाळ जाणे यांना किडनीचा आजार झाला होता. आर्थिक परिस्थिती बेताची असताना उपचारावर खर्च करणे शक्य नसताना मुलाला सुद्धा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यामुळे गोपाळराव जाणे पुरते खचले होते. त्यातही तीन नातींपैकी एकीचे लग्न कसेबसे आटोपले. मात्र, दोन नाती लग्नाच्या असल्याने त्यांचे लग्न आणि मुलाच्या कर्करोगावर उपचार कसा करायचा, या आर्थिक विवंचनेतून गोपाळराव जाणे यांनी स्वतःचेच सरण रचून आत्महत्या केली. रात्रभर गोपाळराव शेतातून घरी परत आले नसल्याने त्यांच्या मुलाने त्यांचा शोध घेतला. शेतातच त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी ज्या पद्धतीने लाकडे रचून असल्याचे दिसून आले त्यावरून गोपाळराव जाणे यांनी स्वतःचीच चिता रचून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. नरखेड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठले आणि अर्धवट जळालेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून तपास सुरू केला आहे.