भारताला पाकबरोबर खेळावेच लागेल - आयसीसीने बीसीसीआयची विनंती फेटाळली
   दिनांक :04-Mar-2019
दुबई,
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांसोबत संबंध संपुष्टात आणण्याची बीसीसीआयची विनंती फेटाळताना अशा प्रकरणात आयसीसीची कुठलीच भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या ४० सैनिकांच्या मृत्यूनंतर बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहिताना विश्व संस्था आणि त्यांच्यासोबत संलग्न असलेल्या देशांना दहशतवाद्यांना शरण देणाऱ्या देशांसोबत संबंध तोडण्याचे आवाहन केले होते.
 
 
आयसीसी चेअरमनने स्पष्ट केले की, कुठल्याही देशाला बहिष्कृत करण्याचा निर्णय सरकारच्या पातळीवर व्हायला हवा आणि आयसीसीमध्ये असा कुठलाही नियम नाही. बीसीसीआयलाही याची कल्पना होती, पण तरी त्यांनी प्रयत्न केला.’ बीसीसीआयने दहशतवाद्यांना शरण देण्याचा आरोप केलेल्या पत्रामध्ये पाकिस्तानचा कुठही उल्लेख नव्हता. हा मुद्दा शनिवारी चेअरमन शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आला, पण त्यावर फार वेळ चर्चा झाली नाही. बैठकीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी करीत होते. बोर्डाचे अधिकारी म्हणाले, ‘सदस्य देशांतील अनेक खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतात आणि ते अशा प्रकारच्या विनंतीला अधिक महत्त्व देत नाही. सुरक्षा हा चिंतेचा विषय असून, त्याला पूर्ण महत्त्व देण्यात आले.
भारतीय क्रिकेट संघाला आगामी विश्वकप स्पर्धेदरम्यान १६ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. पुलवामा हल्ल्यानंतर उभय देशांदरम्यानच्या या लढतीवर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटचे संचालन करीत असलेल्या प्रशासकांच्या समितीने अद्याप याबाबत कुठला निर्णय घेतलेला नसून सरकारचे काय मत आहे, याची प्रतीक्षा करीत आहेत.