संयुक्त राष्ट्रसंघाबाहेर पुलवामा हल्ल्याचा जोरदार निषेध
   दिनांक :04-Mar-2019
थंडीला न जुमानता हजारो लोक रस्त्यावर
 
न्यूयॉर्क, 
कडाक्याच्या थंडीला न जुमानता हजारो अनिवासी भारतीय नागरिकांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या येथील मुख्यालयाबाहेर एकत्र येऊन पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्याचा जोरदार निषेध केला. पाकिस्तानने त्यांच्या भूमीत सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांविरोधात कठोर कारवाई करायलाच हवी, अशी मागणी या नागरिकांनी केली.
 
 
 
न्यूयॉर्कच्या कानाकोपर्‍यातून हजारोंच्या संख्येत नागरिक मुख्यालयाच्या बाहेर जमा झाले होते. हातात फलके घेत त्यांनी पाकिस्तानचा धिक्कार करणार्‍या घोषणा दिल्या. जैश-ए-मोहम्मद आणि या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी त्यांनी केली.
 
अमेरिकन इंडियन पब्लिक अफेयर कमिटीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानविरोधी आंदोलनाचे एक आयोजक जगदीश सेवहानी यांनी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला सांगितले की, या शहरातील भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांनी या निषेध आंदोलनात भाग घेतला होता. जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये पाकिस्तानच्या भूमितूनच दहशतवादी कारवाया केल्या जातात, असा संताप या लोकांनी व्यक्त केला. यावेळी मुंबईवरील २६/११ चा हल्ला, उरी हल्ला आणि २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यासाठीही पाकिस्तानचा निषेध केला.
 
पाकिस्तानला आम्ही या आंदोलनातून कठोर संदेश दिला आहे. आता खुप झाले, यापुढे भारतावर हल्ला झाल्यास आम्ही विसरणारही नाही आणि माफही करणार नाही, असे ते म्हणाले.
 
पाकिस्तानच्या भूमीत असंख्य दहशतवादी संघटना सक्रिय असूनही, हा देश त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास तयार नाही. अल्‌ कायदा, लष्कर-ए-तोयबा, जैश, हक्कानी नेटवर्क यासारख्या अमेरिका आणि भारतविरोधी दहशतवादी संघटनांना पाकिस्तान सरकार, लष्कर आणि आयएसआयचेच समर्थन आहे, असा आरोपही त्यांनी केला.