... तर घरात घुसुन कारवाई करू; इराणचा पाकला गंभीर इशारा
   दिनांक :04-Mar-2019
तेहरान (इराण),
भारताने पाकच्या हद्दीत घुसून 'बालाकोट' येथील दहशतवादी एअर स्ट्राईक केल्यानंतर, आता इराणने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची थेट धमकी दिली आहे. आमच्या देशात हल्ले करणारे अतिरेकी पाकिस्तानच्या भूमीतच आश्रयाला असल्याने, त्यांचा संपूर्ण विमोड करण्यासाठी आम्ही पाकिस्तानात घुसून कारवाई करू, असा गंभीर इशारा इराणने आज सोमवारी दिला.
 
 
 
भारताप्रमाणे इराणही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांनी त्रस्त आहे. पुलवामा येथे पाकधार्जिण्या जैश-ए-मोहम्मदने आत्मघाती हल्ला केला, त्याच दिवशी पाकिस्तानच्या भूमीतच सक्रिय असलेल्या जैश-ए-अदल या अतिरेकी गटाने इराण-पाक सीमेवर हल्ला करून, इराणच्या २७ सैनिकांना ठार केले होते.
 
पाकिस्तानातूनच इराणविरोधी दहशतवादी कारवाया सुरू असतात, पण पाकिस्तान या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलत नसल्यामुळे इराण सरकार आणि सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
 
इराणच्या रिव्हॉल्युशन गार्डचे कमांडर जनरल कासीम सोलेमनी यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराला उघडपणे धमकी दिली आहे. पाकिस्तान कुठल्या दिशेने चालला आहे, तुम्ही तुमच्या शेजारी देशांच्या सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहात. इराणच्या संकल्पाची परीक्षा पाहू नका, अन्यथा त्याचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दात कासीम सोलेमनी यांनी इशारा दिला आहे.
 
मागील काही वर्षात भारत आणि इराणने दहशतवादविरोधी लढ्यातील सहकार्य आणखी मजबूत केले आहे. परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले इराणला जाणार होते. पण भारत-पाकिस्तान तणावामुळे त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहेे.