कुसुमाग्रज यांची कविता जितकी तरल तितकीच ठाम : इरफान शेख
   दिनांक :04-Mar-2019
चंद्रपूर: जगण्याचे विविध कांगोरे कुसुमाग्रजांची कविता सतत धुंडाळत असते. कुसुमाग्रज यांची कविता जितकी तरल आहे तितकीच ती ठाम आहे. ज्या तरलतेने कुसुमाग्रजांनी कविता लिहिल्या तितक्याच खंबीरपणा घेऊन त्यांच्या कविता वाचकांसमोर आल्या आहेत. कवी म्हणून तर जेवढे श्रेष्ठ आहे तेवढेच नाटककार आणि माणूस म्हणूनही त्यांनी श्रेष्ठता जपली. कुसुमाग्रज यांची कविता ज्यावेळेस एकप्रकारे समर्पणाचे भाववृत्ती प्रगट करते त्याच वेळी दुसरीकडे जगण्याचे विविध कांगोरे आपल्या कवितेमधून स्पष्ट करते, असे प्रतिपादन प्रसिद्ध युवा कवी इरफान शेख यांनी केले.
 

 
 
चिंतामणी महाविद्यालय घुग्घुसतर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात  मुख्य  वक्ता म्हणून ते मार्गदर्शन करत होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रवी धारपवार, मराठी विभाग प्रमुख डॉ. माधव कांडणगिरे, युवा कवी आणि राष्ट्रीय पातळीवर सेवा योजना शिबिरात सहभाग दर्शवणारे योगेश भलमे व नवोदित कवी राजेश सोयाम उपस्थित होते.
इरफान शेख यांनी, कुसुमाग्रजांच्या काही कवितांचे दाखले देत कुसुमाग्रजांची कविता अनुभूतीच्या पातळीवर व्यक्तीकडून समष्टीकडे कशी जात असते याचे उत्तम प्रकारे संबोधन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कवितेबद्दल सांगितले. तसेच आपल्या काही कवितांचे सादरीकरणही केले. राजेश सोयाम यांनी, विद्यार्थ्यांसमोर एक कविता आणि एक गझल सादर केली, तर योगेश भलमे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत आपली एक कविता सादर केली.