रात्री तीनच्या सुमारास पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार
   दिनांक :04-Mar-2019
सीमेवरील तणाव कमी करण्याऐवजी पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. भारतानेही पाकिस्तानच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले.

 
 
सकाळी ६.३० च्या सुमारास हा गोळीबार थांबला. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे भारताच्या बाजूला कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. एकाबाजूला शांततेची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला शस्त्रसंधी मोडून भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करायचे हे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण कायम आहे.
शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून तोफाचा वापर करण्यात आला. ज्यामध्ये भारताच्या तीन नागरीकांचा मृत्यू झाला. नियंत्रण रेषेवरील कृष्णा घाटी सेक्टरमधील झालास भागातील सालोत्री गावातील एक महिला आणि तिच्या दोन लहान मुलांचा पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यू झाला.
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पूँछ आणि राजौरी जिल्ह्यातील नागरीकांसाठी ४०० अतिरिक्त बंकर बांधण्याला मंजुरी देण्यात आली आहे. एका महिन्यात दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोनशे बंकर बाधण्यात येणार आहेत. सीमेपलीकडून गोळीबार, तोफांचा मारा झाल्यानंतर नागरीकांना सुरक्षित आसरा घेता यावा यासाठी हे अतिरिक्त बंकर बांधण्यात येणार आहेत.