विंग कमांडर अभिनंदन यांच्या पाठीला इजा- आणखी १० दिवस राहावे लागणार रुग्णालयात
   दिनांक :04-Mar-2019
नवी दिल्ली
विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्याशी सुरक्षा दलांनी रविवारी चर्चा (डीब्रिफिंग) केली. येथील लष्कराच्या रुग्णालयात अभिनंदन यांच्या वैद्यकीय चाचण्या सलग दुसऱ्या दिवशी सुरू होत्या. हवाई दलाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांची रविवारी भेट घेतली. अभिनंदन यांची पाकिस्तानने सुटका केल्यानंतर त्यांना अटारी सीमेवरून नवी दिल्ली येथे आणण्यात आले. सुरक्षा दलाच्या 'कूलिंग डाउन' प्रक्रियेनुसार त्यांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत आहेत.
 

 
 
सुरक्षा दलांनी वर्तमान यांची भेट घेऊन सुरक्षा दलाच्या संकेतानुसार त्यांचे डिब्रिफिंग केले. आणखी काही दिवस ही प्रक्रिया चालेल. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. हवाई दलात लवकरच पुन्हा एकदा ते सक्रिय होतील. भारतात घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान अभिनंदन यांनी मिग-२१ लढाऊ विमानातून पाडले. संघर्षात त्यांचेही विमान पडले. पॅराशूटने उतरल्यानंतर ते पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये गेले. तेथे पाक लष्कराने त्यांना ताब्यात घेतले.
 
अभिनंदन यांना विनाअट तत्काळ सोडावे, असा इशारा भारताने दिल्यानंतर अभिनंदन यांना सोडण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. अत्यंत कठीण प्रसंगांतही अभिनंदन यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचे राजकीय नेते, सुरक्षा तज्ज्ञ, माजी सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे. अभिनंदन यांची संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांची शनिवारी भेट घेऊन विचारपूस केली. संरक्षण दलांच्या उर्वरित प्रक्रिया पार पडल्यानंतर अभिनंदन पुन्हा सेवेत रुजू होतील.
अभिनंदन यांना पॅराशूटमधून उतरल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांच्या पाठीच्या कण्याला जखम झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच विमानातून पॅराशूटमधून उतरताना पाठीच्या खालच्या बाजूलाही जखम झाल्याचे एमआरआयमध्ये निष्पन्न झाले आहे. अभिनंदन यांना काही अंतर्गत जखम झाली आहे किंवा त्यांच्या शरीरात पाकिस्तानने हेरगिरीसाठी काही यंत्रे लावली आहेत का हे तपासण्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात कोणतेही यंत्र आढळले नाही. अभिनंदन यांच्या पुढील १० दिवसांत आणखी चाचण्या होणार आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून शारीरिक छळ केला नसल्याचे आणि काही प्रमाणात मानसिक छळ केल्याचे अभिनंदन यांनी म्हटले आहे.