काँग्रेस संघाशी लढण्यास तयार नाही : अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर
   दिनांक :05-Mar-2019
अकोला,
सध्या काँग्रेस ही मनुवादाने ग्रस्त असून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दोन हात करण्यास तयार नाही. त्यामुळे काँग्रेसने संघाला घटनेच्या चौकीट आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज वंचित बहूजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
सध्याची काँग्रेस ही गांधी विचाराची नाही, त्यामुळे त्यांना वारंवार गांधी विचारांचा दाखला द्यावा लागतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आणण्यासाठी गेली पन्नास वर्षे काँग्रेसने काहीच केले नाही. जेव्हा मी मागणी केली तेव्हा त्यांनी परत तो चेंडू माझ्याच कोर्टात टाकला. मी त्यांना मसुदा तयार करुन देईल पण, तो त्यांना मान्य नसेल त्यामुळे त्यांनीच तो तयार करावा म्हणजे त्यांना तो मान्य राहील. अन्यथा, संयुक्त पातळीवर त्याची निर्मिती करत मुद्दे निश्चित केल्यानंतर तो अंतिम स्वरुपात कायम करावा. पण, त्या दृष्टीने काँग्रेसने सुरुवात केली हे ही नसे थोडके असे म्हणत त्यांनी पुन्हा काँग्रेसकडे बोट दाखविले.
 
 
 
राजकीय पातळीवर महाआघाडीसोबत अद्याप कुठलीही अंतिम बोलणी झाली नाही. तर वंचित बहूजन आघाडीने २२ ठिकाणी उमेदवार उभे केले आहे. नाशिक येथे छगन भुजबळ हे उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर सुनिल तटकरे आणि अजित पवार यांच्या विरोधात ही आम्ही उमेदवार देणार नाही. पक्षीय राजकारणात विरोधक असावे पण, त्यांच्याशी शत्रूसारखे वैरभाव नको तो तुर्तास देश पातळीवर निर्माण झाल्याचे चित्र असल्याचे ते म्हणाले.
 
जगभरातील माध्यमांनी पाकिस्तानातील हल्ल्यात दहशतवाद्यांचे नुकसान झाले नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर पाकिस्तानात झालेल्या हल्ल्याचे छायाचित्र प्रसिध्द करा असे आवाहन त्यांनी पंतप्रधानांना केले. असे फोटो सार्वजनिक केल्यास दहशतवादाविरोधातील लढाईला मजबूती मिळेल, अन्यथा त्याची धार कमी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह हे मोठ्या संख्येत दहशतवादी ठार झाल्याचे सांगत फिरत आहे. त्याचवेळी सैन्यातर्फे निश्चित आकडा सांगितला जात नाही. त्यामुळे भारताची मवाळ देश असल्याची प्रतिमा तयार होत आहे, असा आरोप त्यांनी केला.