पाकपासून सावध राहण्याची गरज!
   दिनांक :05-Mar-2019
कुख्यात अतिरेकी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा सूत्रधार मसूद अजहरच्या मृत्यूची बातमी अचानक येणे, ही पाकिस्तानची आणखी एक चाल राहू शकते. यातून पाकिस्तानला भारतासोबत संयुक्त राष्ट्रचीही दिशाभूल करायची असावी, असे वाटते. पण, अशा नाटकांना आता भारतातीलच काय, पण पाकिस्तानातील जनताही बळी पडण्याची शक्यता नाही.
 
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणार्‍या ‘जैश-ए-मोहम्मद’चा पर्यायाने मसूद अजहरचा संसदेवरील हल्ल्यापासून भारतातील विविध घातपाती कारवायांमध्ये सहभाग राहिला आहे. यावेळी मात्र पुलवामा येथील हल्ल्यानंतर ‘जैश-ए-मोहम्मद’च नाहीतर, पाकिस्तानही अडचणीत आला आहे. आजपर्यंत भारतात केलेले अन्य अतिरेकी हल्ले पचले, तोंडी निषेध करण्यापलीकडे भारत फार काही करू शकणार नाही, असा ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि पाकिस्तानचाही अंदाज होता, पण हा अंदाज भारताने खोटा पाडला.
 
 
 
आतापर्यंत भारतात जेवढे अतिरेकी हल्ले झाले तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते, याचा ‘जैश-ए-मोहम्मद’च नाही तर पाकिस्तानलाही विसर पडला. भारतात आतापर्यंत झालेले पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी यांच्यात मूलभूत फरक आहे, जी भाषा समोरच्याला समजते, त्याच भाषेचा वापर मोदी उत्तर देण्यासाठी करत असतात. पाकिस्तान हा ‘लातो के भूत बातो से नही मानते’, या वर्गवारीतील देश आहे. त्यामुळे मोदी यांनी पाकिस्तानात घुसून हवाई हल्ले करून पाकिस्तानला त्याची जागाच दाखवली नाही, तर जगात त्याचे पार वस्त्रहरण करून टाकले.
 
खरं म्हणजे जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे अस्तित्व मिटवणे मोदींसाठी फारसे कठीण काम नाही. लोकभावनेचा दबाव असतानाही मोदी यांनी स्वत:वर संयम घातला आणि जगाला दाखवण्यासाठी पाकिस्तानला सुधारण्याची एक संधी दिली. या संधीचे सोने करायचे की माती, याचा निर्णय आता पाकिस्तानला करायचा आहे. पाकिस्तानातील राज्यकर्ते कोणत्याही संधीचे कधी सोने करू शकत नाही, त्यामुळे ते या संधीची माती करणार आणि आपल्यासोबत देशातील जनतेलाही मातीत घालणार, याबाबत शंका नाही.
 
पुलवामा येथील आत्मघातकी हल्ल्यानंतर जागतिक जनमत पूर्णपणे पाकिस्तानच्या विरोधात गेले, आजपर्यंत असे कधी झाले नव्हते. हे भारताच्या मुत्सद्देगिरीचे मोठे यश मानावे लागेल. मात्र, यातून काही धडा घेईल तो पाकिस्तान कसला! आतापर्यंत ‘जैश-ए-मोहम्मद’चा सूत्रधार मसूद अजहर हा आमच्या देशात नाही, असे पाकिस्तानी राज्यकर्ते सांगत असत. पण, बालाकोट येथील भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानचे हे पितळही उघडे पडले. भारताचे गुन्हेगार असलेले मसूद अजहर आणि अन्य अतिरेकी पाकिस्तानात आहेत, हे जगाला कळून चुकले. मसूद अजहर मूत्रिंपडाच्या त्रासाने ग्रस्त आहे, पाकिस्तानातील लष्करी रुग्णालयात त्याचे डायलेसिस सुरू आहे, असे पाकिस्तानला सांगावे लागले. मात्र, यातून आपण आपलाच खोटारडेपणा जगासमोर उघड करतो आहे, याचे भानही पाकिस्तानला राहिले नाही.
 
आता तर मसूद अजहर मृत्यू पावल्याची बातमी पाकिस्तानने पसरवली. दोन कारणांनी पाकिस्तानने मसूद अजहरच्या मृत्यूची बातमी पसरवली असावी, असे वाटते. एकतर भारतातील आक्रोश पाकिस्तानला कमी करायचा असावा, दुसरे म्हणजे भारताचा पाकिस्तानवरील संभाव्य हल्ला रोखून धरायचा असावा. मसूद अजहर आता जिवंत नाही, हे समजताच भारताचा राग कमी होईल आणि तो पाकिस्तानवर निर्णायक हल्ला करायचा प्रयत्न सोडून देईल, असे पाकिस्तानला वाटत असावे. या बातमीमागचा दुसरा पैलू आंतरराष्ट्रीय आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय अतिरेकी घोषित करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांनी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव दिला आहे. आतापर्यंत चीन या प्रस्तावाला विरोध करायचा. यावेळी मात्र चीनने या प्रस्तावाला पािंठबा देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे हा प्रस्ताव पारित होण्याची शक्यता बळावली.
 
हा प्रस्ताव पारित झाला तर मसूद अजहरला जगात कुठेच फिरता येणार नाही, त्याची सगळी बँकखाती जप्त होतील तसेच त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार सगळ्या जगाला मिळेल. या परिस्थितीत पाकिस्तानही मसूद अजहरला वाचवू शकणार नाही, त्यामुळे या प्रस्तावाला असलेला आपला विरोध पाकिस्तानने मागे घेतला आहे. यातून आपणही दहशतवादाच्या विरोधात असल्याचे पाकिस्तानला दाखवायचे आहे. मसूद अजहरला वाचवावे तर आपला बळी जातो, हे पाकिस्तानला जाणवल्यामुळे पाकिस्तानने मसूद अजहरच्या मृत्यूची बातमी पसरवली असावी, असे वाटते. पाकिस्तानची जागतिक राजकारणात किती आणि कशी कोंडी झाली, ते यातून दिसून येते. मसूद अजहरचा असा नैसर्गिक मृत्यू भारतातील कुणालाच मान्य नाही. जोपर्यंत त्याला गोळ्‌या घालून मारले जात नाही, तोपर्यंत पुलवामा येथील शहीदांच्या बलिदानाचा बदला पूर्ण होणार नाही. गेला बाजार ओसामा बिन लादेनला अमेरिकेने ज्या पद्धतीने मारले, त्याच पद्धतीने मसूद अजहरला भारताने मारले पाहिजे, अशी संतप्त देशवासीयांची भावना आहे. अमेरिका जे करू शकते, ते भारतही करू शकतो, असा सूचक इशाराही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच दिला आहे. त्यामुळे देशातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असाव्या.
 
त्यामुळे मृत्यूची अफवा पसरवून मसूद अजहरला वाचवण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मसूद अजहरचा मृत्यू हा खरा की ती अफवा, हे फार काळ लपून राहू शकणार नाही. मात्र, पाकिस्तानने मसूद अजहरला वाचवण्यासाठी त्याच्या मृत्यूची अफवा पसरवली, हे सिद्ध झाले तर पाकिस्तानच्या अडचणी वाढू शकतात. ‘इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा’ याप्रमाणे मसूद अजहरसोबत पाकिस्तानलाही त्याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते.
 
वायुसेनेच्या पराक्रमामुळे जगात भारताची मान उंचावली असताना आणि पाकिस्तानची पाचावर धारण बसली असताना, देशातील विरोधक मात्र या हवाई हल्ल्याचे आता पुरावे मागत आहेत. विरोधकांनी याआधी ‘सर्जिकल स्ट्राईक’चेही पुरावे मागितले होते. मोदी आणि भाजपा पुलवामा घटनेचे राजकीय भांडवल करत असल्याचा आरोप करणार्‍या विरोधी पक्षांना, आपणही तेच करत असल्याचा विसर पडला आहे. पंतप्रधान म्हणून मोदी चुकत असतील, तर त्यांच्यावर टीका करण्याचा विरोधी पक्षांना पूर्ण अधिकार आहे. मात्र, मोदींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करताना आपल्या सेनादलांना आपण खोटे पाडतो, त्यांचे मनोधैर्य खचवतो, याचे भान विरोधी पक्षांना राहिले नाही, याचे वाईट वाटते.
 
आपल्या राजकीय फायद्यासाठी देशाच्या एकतेची आणि अखंडतेची किंमत देणे कुणाला परवडणारे नाही, याची जाणीव विरोधी पक्षांनी ठेवली पाहिजे. अन्यथा त्यांच्यात आणि पाकिस्तानच्या वागणुकीत फरक काय राहिला? विरोधी पक्षांचे नेते पाकिस्तानी लष्कराचीच भाषा बोलत आहेत, असे जर कुणाला वाटते तर त्याला दोष कसा देता येईल? मुळात मोदी यांच्या खंबीर हातात देशाचे भविष्य सुरक्षित असल्याचा विश्वास देशातील जनतेत निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व मोदींकडे सोपवण्याचा संकल्प देशवासीयांनी सोडला आहे. हा विश्वास जसा मोदी यांनी आपल्या कृतीने निर्माण केला तसाच तो विरोधी पक्षांनी आपल्या बेजबाबदार वर्तणुकीने गमावला आहे...