अफजल गुरूच्या मुलाला आधार कार्ड मिळाल्याचा अभिमान
   दिनांक :05-Mar-2019
संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरूचा मुलगा गालिब याला आधार कार्ड मिळाले आहे. भारतीय आधार कार्ड मिळाल्याचा अभिमान आणि आनंद असल्याचे वक्तव्य १८ वर्षीय गालिबने केले आहे. गालिब गुरू सध्या नीट (NEET) परीक्षेची तयारी करत असून त्याला भविष्यात डॉक्टर व्हायची इच्छा आहे. गालिबने दहावीमध्ये ९५ तर बारावीमध्ये ८८.२ टक्के गुण मिळवले आहेत.
 
 
सहा वर्षापूर्वी दहशतवादी अफझल गुरूला फाशीची शिक्षा दिली होती. गालिब आजोबा गुलाम मोहम्‍मद आणि आई तबस्‍सुमसोबत श्रीनगरजवळील गुलशनाबाद गावात राहत आहे. गालिबला वडलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आधार कार्ड मिळाल्याचा अभिमान आहे, आता मला पासपोर्ट मिळावा अशी इच्छा प्रसारमाध्यमांशी बोलताना गालिबने व्यक्त केली.
वडिलांप्रमाणे मी दहशतवादाच्या मार्गावर कधीही जाणार नाही. दहशतवाद, काश्मीरचे स्वातंत्र्यापेक्षा मला माझी आई महत्वाची आहे. काश्मीरबद्दल कोणी काहीही सांगितलं, भडकावण्याचा प्रयत्न केला तर ऐकू नकोस, दहशतवादाच्या वाटेवर जाऊ नकोस, अशी सक्त ताकीदच मला आईने दिल्याचे गालिब म्हणाला.
‘माझे वडिल शेर-ए-काश्मीर महाविद्यालयातून वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत होते. मात्र, ते शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. मला वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे गालिब म्हणाला.’ तुर्कस्तानातील मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर व्हायचे आहे पण जर आईने परवानगी दिल्यास भारतातील मेडिकल कॉलेजमध्येही शिक्षण घेण्यास तयार आहे असेही तो म्हणाला.