भारताला 'शंकर' पावला; ऑस्ट्रेलियावर रोमांचक विजय
   दिनांक :05-Mar-2019
-एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा हा पाचशेवा विजय 
 
नागपूर, 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामन्यात भारताने कर्णधार विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या (११६) आणि विजय शंकरच्या (४६) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ८ धावांनी रोमांचक विजय मिळवला.  भारताने दिलेल्या २५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.३ षटकांत २४२ धावांत माघारी परतला. या विजयासह  ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली आहे. तसेच, एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा हा पाचशेवा विजय ठरला आहे.
 
 
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने स्फोटक फलंदाज रोहित शर्माला शून्यावर तंबूत पाठवले. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेला कर्णधार विराट कोहली आजच्या सामन्यात चमकला. त्याने  १०७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४० वे शतक ठरले. पण चांगली सुरुवात करून ४६ धावांची खेळी करणारा विजय शंकर कमनशिबी ठरला.
 

 
 
कोहलीने लगावलेला चेंडू थेट नॉन स्ट्राईकच्या स्टंपवर आदळला. त्या दरम्यान चेंडू गोलंदाजाच्या हाताला स्पर्श करून गेला होता. त्यामुळे विजय शंकर धावबाद झाला. पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देणारी जोडी केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघे एका पाठोपाठ एक बाद झाले. 
 
 
यानंतर धावांचा पाठलाग करताना मार्कस स्टॉइनिसचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला यावेळी अर्धशतकी खेळी साकारता आली नाही. त्याचबरोबर त्यांच्याकडून मोठ्या भागीदाऱ्याही पाहायला मिळाल्या नाहीत. अखेरच्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. पण विजय शंकरने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्टॉइनिसचा अडसर दूर केला. स्टॉइनिसने चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 52 धावांची खेळी साकारली. तो बाद झाल्यावर दुसऱ्या चेंडूवर दोन धावा ऑस्ट्रेलियाने काढल्या. पण तिसऱ्या चेंडूवर शंकरने झाम्पाला त्रिफळाचीत करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून कुलदीप यादवने तीन बळी मिळवले, तर मोहम्मद शमी आणि शंकरने प्रत्येकी दोन बळी मिळवले.