जैशच्या ४४ दहशदवाद्यांना पाक ने केली अटक
   दिनांक :05-Mar-2019
अखेर भारताच्या दबावापुढे पाक नमला !
 
 इस्लामाबाद : भारताच्या वाढत्या दबावापुढे पाक ने गुडघे टेकवत मसूद अझहरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफसह जैशच्या ४४ दहशतवाद्यांना पाकिस्तानने अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. भारतासह जगभरातून दहशदवादावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर वाढत्या दबावाचा हा परिणाम आहे. पाकिस्तानचे मंत्री शहरयार खान अफ्रिदी यांनी पत्रकारपरिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली.
 

 
 
मसूद अझहरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ व हमाद अझहर यांना ४४ जणांसह अटक करण्यात आल्याचे अफ्रिदी यांनी स्पष्ट केले. भारताने पाकिस्तानला गेल्या आठवड्यात दिलेल्या अहवालामध्येही रौफ व अझरच्या नावांचा समावेश होता असे ते म्हणाले. अर्थातच नेहमीप्रमाणे पाक ने कुठल्याही दबावाखाली ही कारवाई केली नसल्याचे सांगितले. 
बंदी घातलेल्या सगळ्या संघटनांविरोधात कारवाई करण्यात येईल असे अफ्रिदी यांनी सांगितले. देशामध्ये बंदी असलेल्या संघटनांवर कारवाई संदर्भात संयुक्त राष्ट्रांचे काही निकष आहेत. या संदर्भातील कारवाईचे सुनियोजन करता यावे यासाठी पाकिस्तानच्या संसदेने सोमवारी एक कायदा मंजूर केला.
या अंतर्गत बंदी घातलेल्या संघटनांची मालमत्ता व संपत्ती सरकारला ताब्यात घेता येणे सहजशक्य होते. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे शहरयार खान यांनी सांगितले.