पाक एअर स्ट्राईकचा धक्का भारतातल्या काही लोकांना बसला-मोदी
   दिनांक :05-Mar-2019
लवामा येथील भ्याड हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी वायुदलाने हवाई हल्ला करून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर हवाई दलाचं आणि या कारवाईचं देशभरात कौतुक झालं आता मात्र विरोधकांकडून या कारवाईचे पुरावे मागितले जात आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. एअर स्ट्राईक अर्थात हवाई हल्ला पाकिस्तानात बालाकोटमध्ये झाला मात्र धक्का मात्र भारतातल्या काही लोकांना बसला असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

 
दहशतवादी हल्ला झाला की भारत तोडीस तोड उत्तर देतो. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करतो. मात्र त्याचंही राजकारण भारतातले काही लोक करत आहेत ही बाब दुर्दैवी आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. मध्यप्रदेशात झालेल्या भाजपाच्या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
विरोधक जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी शत्रू राष्ट्राला कधीही चोख प्रत्युत्तर दिलं नाही. आता मात्र आपल्या शूर जवानांच्या कामगिरीवर या विरोधकांनी संशय घेण्यास सुरुवात केली आहे. यावरून विरोधकांची मानसिकता काय हे लक्षात येते असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर २६/११ च्या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला क्लिन चिट कुणी दिली? असाही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.