ऑस्ट्रेलियासमोर २५१ धावांचे लक्ष
   दिनांक :05-Mar-2019
नागपूर,
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने केलेल्या दमदार शतकाच्या (११६) जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे २५१ धावांचे लक्ष ठेवले आहे.
 
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने डावाला अप्रतिम सुरुवात करून दिली. पहिलं षटक निर्धाव टाकत त्याने स्फोटक अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला तंबूत पाठवले. रोहितला भोपळाही फोडता आला नाही. मॅक्सवेलला गोलंदाजी देणे ऑस्ट्रेलियाचा लाभदायक ठरले. शिखर धवन (२१) ला त्याने पायचीत पकडले. पंचांनी नाबाद ठरवल्याने ऑस्ट्रेलियाने डीआरएसची मदत घेतली, त्यात तिसऱ्या पंचानी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने कौल दिला. लायनच्या पहिल्याच षटकात अंबाती रायडू (१८) पायचीत झाला. भारताने डीआरएसची मदत घेतली. पण निकाल भारताच्या विरोधात लागल्याने एकमेव रिव्ह्यू गमावत भारताला तिसरा धक्का बसला.
 
 
पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेला कर्णधार विराट कोहली आजच्या सामन्यात चमकला. त्याने ५५ चेंडूत आपले अर्धशतक ठोकले. पण चांगली सुरुवात करून ४६ धावांची खेळी करणारा विजय शंकर कमनशिबी ठरला. कोहलीने लगावलेला चेंडू थेट नॉन स्ट्राईकच्या स्टंपवर आदळला. त्या दरम्यान चेंडू गोलंदाजाच्या हाताला स्पर्श करून गेला होता. त्यामुळे विजय शंकर धावबाद झाला. पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देणारी जोडी केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघे एका पाठोपाठ एक बाद झाले.
 
झॅम्पाने २ चेंडूत २ बळी मिळवले. केदार जाधव ११ तर धोनी पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. चौकार लगावत कर्णधार कोहलीने आपले दमदार शतक ठोकले. त्याने १०७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४० वे शतक ठरले. मात्र शेवटच्या काही षटकात भारताने झटपट गडी गमावले. जाडेजा (२१) झेलबाद झाला, तर कोहली शतक लगावून ११६ धावांवर माघारी परतला. तळाचा फलंदाज कुलदीप यादवदेखील त्रिफळाचीत झाला. त्याला पॅट कमिन्सने माघारी धाडले. पाठोपाठ बुमराहही शून्यावर बाद झाला. त्यामुळे भारताचा डाव अडीचशे धावांवर आटोपला. पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ बळी टिपले.
 
दरम्यान, या सामन्यात भारताकडून संघात बदल करण्यात आलेला नाही. मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. अनुभवी शॉन मार्श आणि फिरकीपटू नॅथन लायन यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तर ऍश्टन टर्नर आणि जेसन बेहरेनडॉर्फ याना वगळण्यात आले आहे.