अमेरिकेने काढला GSP दर्जा
   दिनांक :05-Mar-2019
नवी दिल्ली:
व्यापाराच्या बाबतीत भारताला दिलेला विशेष प्राधान्याचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळं भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या काही वस्तूंवरील करसवलती रद्द होणार असून भारताला प्रतिवर्षी सुमारे २० कोटींचा फटका बसणार आहे. अमेरिका सरकारचा हा निर्णय दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापाराला धक्का पोहोचवणारा असल्याचं मानलं जात आहे.
 
 
जनरलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरन्सेस (जीएसपी)च्या अंतर्गत भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या सुमारे ४०० अब्ज किंमतीच्या वस्तूंवर अमेरिकेत आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. त्यामुळं भारताला १९ ते २० कोटींचा फायदा होत होता. मात्र, अमेरिकेनं जीएसपी दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळं भारताला आता हा फायदा मिळणार नाही.
अमेरिकी सिनेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ही घोषणा केली. भारताबरोबरच तुर्कीचाही जीएसपी दर्जा काढून घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. भारतीय बाजारात अमेरिकेला न्याय्य व योग्य व्यापारसंधी मिळवून देण्याची हमी भारताकडून मिळत नसल्यानं हा निर्णय घेत असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
अमेरिकेच्या या निर्णयामुळं भारताला कुठलाही मोठा फरक पडणार नसल्याचं वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी सांगितलं. 'जीएसपी दर्जामुळं भारताला होणारा फायदा तुलनेनं क्षुल्लक होता. त्यामुळं भारत या निर्णयाला प्रत्युत्तर देणार नाही. अमेरिकेच्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क आकारणार नाही,' असं वाधवान यांनी म्हटलं आहे.
जीएसपी म्हणजे...
जीएसपी म्हणजे 'जनरलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रिफरेन्सेस'. विकसनशील देशांच्या आर्थिक वाढीला हातभार म्हणून अमेरिकेनं १९७६ साली जीएसपी सुरू केली होती. या अंतर्गत विकसनशील देशांतील काही वस्तू अमेरिकेत विनाशुल्क किंवा नगण्य शुल्क आकारून आयात केल्या जातात. आतापर्यंत जगातील सुमारे १२९ देशांतील ४,८०० वस्तूंवर हा सूट मिळाली आहे. भारत व तुर्कीला आता ही सूट मिळणार नाही. अमेरिका सरकारचा नवा निर्णय दोन महिन्यांनंतर लागू होणार आहे.