प्रजनेशची आगेकूच,रामकुमार बाहेर
   दिनांक :06-Mar-2019
इंडियन वेल्स,
बीएनपी पॅरिबस ओपन- इंडियन वेल्स पात्रता टेनिस स्पर्धेचा पहिला दिवस भारतीय टेनिसपटूंसाठी संमिश्र राहिला. नववा सीड प्रजनेश गुणेश्वरनने आगेकूच केली, तर रामकुमार रामनाथन स्पर्धेतून बाहेर झाला. अलीकडेच अव्वल शंभरमध्ये स्थान मिळविणारा भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश याने जागतिक क्रमवारीत १३२ व्या क्रमांकावर असलेल्या जेसन जंगवर अंतिम पात्रता सामन्यात ७-५, ६-४ असा विजय नोंदविला.
 
 
 
आता पहिल्या एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी २९ वर्षीय प्रजनेशला पुढील सामन्यात इटलीच्या सॅल्व्हाटोर कॅरुसोविरुद्ध झुंज द्यावी लागणार आहे. गतवर्षी जून महिन्यात आपली पहिली एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धा खेळल्यानंतर प्रजनेशने यावर्षी अलीकडेच ऑस्ट्रेलियन ओपनच्या माध्यमातून ग्रँड स्लॅममध्ये पदार्पण केले. पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात रामकुमार रामनाथनला जागतिक क्रमवारीत ११३ व्या क्रमांकावर असलेल्या फिलिप क्रायनोव्हिककडून ४-६, ०-६ असा पराभव पत्करावा लागला.