आलिया करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण
   दिनांक :06-Mar-2019
आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांना भूरळ घालणारी अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अभिनयानंतर आलियाने तिचा मोर्चा निर्मिती क्षेत्राकडे वळवला असून लवकरच ती स्वत:च प्रोडक्शन हाऊस सुरु करणार आहे. आलियाने एका मुलाखतीमध्ये स्वत: याविषयाची माहिती दिली आहे.
 
 
“कलाविश्वामध्ये अभिनयाची चुणूक दाखविल्यानंतर मी आता निर्मितीक्षेत्रात पदार्पण करत आहे. लवकरच माझे स्वत:च प्रोडक्शन हाऊस सुरु होणार असून इटर्नल सनशाईन प्रोडक्शन्स असे माझ्या प्रोडक्शन हाऊसचे नाव असणार आहे. सध्या या निर्मिती संस्थेचे काम सुरु आहे. चित्रपटांची निर्मिती करावी असे माझे लहानपणापासूनच स्वप्न होते. हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. जे चित्रपट मला पाहायला आवडतील अशाच स्वरुपाच्या चित्रपटांच्या निर्मितीकडे माझा कल असेल”,असे  आलियाने ‘डेक्कन क्रोनिकल’ला सांगितले.
 “नुकतेच मी एक अपार्टमेंट विकत घेतले आहे. मात्र हे अपार्टमेंट घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. काहींच्या मते मी या नव्या घरात शिफ्ट होणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु असे काहीच होणार नसून मी माझ्या घरांतल्यांना सोडून वेगळे राहू शकत नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये तथ्य नाही. तसेच हे नवे अपार्टमेंट मी माझ्या प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिससाठी घेतले आहे. माझे नवीन ऑफिस या ठिकाणी असेल”.