१५०० चौरस फुटांच्या जागेचा प्रश्न नाही, हा धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न आहे- सुप्रीम कोर्ट
   दिनांक :06-Mar-2019
अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली असून हा जमिनीशी नव्हे तर धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणात मध्यस्थ नेमण्यासंदर्भातील निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला असून या प्रकरणातील सर्व पक्षकार मध्यस्थांची नावे सुचवू शकतात, असे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
 

 
 
अयोध्येतील २.७७ एकर जागेचे सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांच्यात समान वाटप केले जावे, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने ४ दिवाणी दाव्यांमध्ये २०१० साली दिला होता. त्याला आव्हान देणाऱ्या १४ याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण व एस.ए. नझीर या न्यायाधीशांचा या घटनापीठात समावेश आहे.
बुधवारी सुनावणीला सुरुवात होताच हिंदू महासभेच्या वकिलांनी या प्रकरणात मध्यस्थ नेमण्यास विरोध दर्शवला. अयोध्येचा प्रश्न हा धार्मिक भावनांशी जोडलेला आहे, असे वकिलांनी सांगितले. यावर न्या. बोबडे यांनी सांगितले की, आम्हाला देखील जनभावना माहित आहे. हा फक्त १५०० चौरस फुटांच्या जागेचा प्रश्न नाही. हा धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न आहे. याच्याशी राजकारण देखील संबंधित आहे, असे बोबडे यांनी सांगितले. आम्ही लोकांच्या मनाचा, भावनांचा विचार करत जखमा भरुन काढण्याच्या मार्गाचा विचार करत आहोत, आम्हाला देखील या वादावर लवकरात लवकर तोडगा काढायचा आहे, असे बोबडे यांनी स्पष्ट केले.