१४०० मतदान असणाऱ्या केंद्राची होणार विभागणी - जिल्ह्यात १४ सहाय्यकारी मतदान केंद्र नवीन
   दिनांक :06-Mar-2019
वर्धा,
निसपक्षपाती व पारदर्शी मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी बोगस मतदान होऊ नये तसेच मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी निवडणूक आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात नव्याने १४ सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनोद भीमनवार यांनी दिली.
 
 
 
लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हाप्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे. आपण स्वतः जिल्हयातील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करून माहिती घेत आहोत. दिव्याग व्यक्तींना मतदानासाठी येताना त्रास होऊ नये यासाठी ज्या शाळां वा मतदान केंद्रामध्ये रॅम्प नाही त्या ठिकाणी रॅम्प तयार करण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात दिव्याग मतदारांची मोजणी प्रथमच झालेली आहे. जिल्ह्यात ३ हजार ४१९ दिव्याग मतदार आहेत. यात ६६९ अंध, ५७४ मूक, १ हजार ७९० अस्थिव्यंग तर इतर व्यग असलेले ३४० मतदार आहेत, असे ते म्हणाले.
 
जिल्ह्यात १ हजार ३१४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १ हजार ४०० मतदान असते. व्हीव्ही पॅट मशीनच्या मतपत्रिकेची क्षमता १५०० असते. बोगस मतदान होऊ नये यासाठी निवडणूक विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे एकाच मतदान केंद्रावर १४०० पेक्षा जास्त मतदार होत असतील तर ते मतदान केंद्र विभागून त्याच ठिकाणी दुसरे केंद्र तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार वर्धा जिल्ह्यात १४ सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. यात ग्रामीण ४ तर शहरी १० केंद्र असून सर्वाधिक केंद्र हिंगणघाट तालुक्यात आहेत. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात ८ शहरी व १ ग्रामीण, देवळीत १ शहरी व १ ग्रामीण तर वर्धा विधानसभेत १ शहरी व २ ग्रामीण सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती प्रवीण मेहरे यांनी दिली.
 
३१ जानेवारी २०१९ च्या नोंदणी नुसार वर्धा जिल्ह्यत ११ लाख २९ हजार १२४ मतदार आहेत. यात पुरुष मतदार ५ लाख ७९ हजार ८५२ तर ५ लाख ४९ हजार २५४ स्त्री मतदार आहेत. यात आर्वी विधानसभा मतदार संघात २ लाख ५६ हजार ६२२, देवळी २ लाख ६९ हजार ४४३, आर्वी २ लाख ९२ हजार ९१५ तर वर्धा विधानसभा क्षेत्रात ३ लाख १० हजार ५३ मतदार असून ९४.१५ टक्के लोकांकडे फोटोसह मतदान ओळख पत्र असल्याचे मेहरे यांनी सांगितले.
 
२ हजार २२६ मतदार लोकप्रतिनिधी
खासदार, आमंदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, पंचयत समिती सभापती व सदस्य, नगर पालिका अध्यक्ष, नगरसेवक, ग्रामपंचायत सद्स्य असे २ हजार २२६ लोकप्रतिनिधी मतदार आहेत. यात आर्वी विधानसभा क्षेत्रात ३००, देवलीत ६०१, हिंगणघाट येथे १००५ तर वर्धा विधानसभा क्षेत्रात ३२० लोकप्रतिनिधी मतदार असल्याची नोंद निवडणूक विभागात करण्यात आली आहे.