सराफावर गोळीबार करीत अडीच-तीन किलो सोने लंपास
   दिनांक :06-Mar-2019
पिंपरी,
सराफावर गोळीबार करीत चोरट्यांनी सुमारे अडीच-तीन किलो सोने लंपास केल्याची घटना रहाटणीतील कोकणे चौक येथील पुणेकर ज्वेलर्स मध्ये घडली आहे. दिव्यांक मेहता असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एकच्या सुमारास दुकानात तीन जण घुसले. त्यांनी दुकानाचे शटर बंद करून दिव्यांक यांच्या पायावर गोळी मारून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले. तर अन्य दोघांनी शेजारी दुकानदाराला बोलण्यात गुंतवले होते. चोरट्यांनी जाताना दुकानातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन देखील काढून नेले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून या घटनेची कसून चौकशी सुरू आहे.