अभिनंदन यांची शौर्यगाथा पाठयपुस्तकात
   दिनांक :06-Mar-2019
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची शौर्यगाथा आता पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली जाणार आहे. राजस्थानच्या शाळांमधील मुलांना अभिनंदन यांची शौर्यगाथा वाचायला मिळणार आहे. शिक्षणमंत्री गोविंद सिंह दोतसारा यांनी याबाबतची माहिती दिली.
 
 
जोधपूरमध्ये शिक्षण घेतलेले आणि अलीकडेच पाकिस्तानच्या भूमीत पराक्रम गाजवून मायभूमीत परतलेले विंग कमांडर अभिनंदन यांचा गौरव म्हणून सरकार त्यांची शौर्यगाथा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणार आहे. असा निर्णय घेण्यात आला आहे, असे राजस्थानचे शिक्षण मंत्री दोतसारा यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे. मात्र, कोणत्या वर्गाच्या पुस्तकात अभिनंदन यांची शौर्यगाथा असेल याची माहिती अद्याप दिली नाही. याआधीही दोतसारा यांनी पुलवामा हल्ल्याच्या घटनेचा समावेश पाठ्यपुस्तकात करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. शालेय मुलांना शहीद जवानांच्या शौर्याची माहिती मिळावी यासाठी त्यांच्या शौर्यगाथा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्या कोणत्या स्वरुपात असतील, त्यातील संदर्भ काय असतील, याबाबत पाठ्यपुस्तक समिती निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले होते.