निरव मोदींचा आलिशान बंगला उद्ध्वस्त करणार
   दिनांक :06-Mar-2019
पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदीचा अलिबागमधील किहिम समुद्रकिनाऱ्यालगतचा ३० हजार चौरस फुटांवरील अलिशान बंगला शुक्रवारी सकाळी उद्ध्वस्त करण्यात येणार आहे. हा बंगला जमीनदोस्त करण्याची तयारी रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.
 

 
 
नीरव मोदीच्या बंगल्यातील टाइल्स आणि प्लास्टर मंगळवारी यंत्राच्या मदतीने उखडून काढण्यात आले. आरसीसी खांबांमध्ये ड्रिलिंग मशीनच्या साह्याने छिद्रे पाडून त्यात डायनामाइट पेरण्यात येणार आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांच्याकडे पाडकामाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या देखरेखीखाली नीरव मोदीचा बंगला डायनामाइटने उद्ध्वस्त केला जाणार आहे. शितोळे यांनी २००० आणि २००१ मध्ये भाईंदरमधील ४० अनधिकृत इमारती स्फोटकांनी उद्ध्वस्त केल्या होत्या. बंगला पाडण्याचे काम मंगळवारीही दिवसभर सुरू होते. शितोळे हे दिवसभर त्यावर लक्ष ठेवून होते.
'सध्याच्या बाजारभावानुसार नीरव मोदीच्या या अलिशान बंगल्याची किंमत २५ कोटी रुपये आहे. बांधकामासाठी उच्च दर्जाच्या सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे खोदकाम यंत्राच्या साह्याने बंगला जमीनदोस्त करण्यात अडचणी येत आहेत,' अशी माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप जोग यांनी दिली.