सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव
   दिनांक :06-Mar-2019
सोलापूर विद्यापीठाचा अखेर नामविस्तार झाला असून विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ही दीर्घकालिन मागणी आता पूर्ण झाली आहे. सध्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यातच राज्यात धनगर आरक्षणाच्या मुद्द्याने जोर धरला आहे. त्यामुळे या समजाला खुश करण्याच्या हेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही खेळी खेळली आहे.
 
 
त्यामुळे मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार, सोलापूर विद्यापीठाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर’ असे करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचे नाव देण्याचा विषय मागे पडला आहे. यासाठी शिव विरशैव संघटनेने राज्यभारात आंदोलन छेडले होते. तसेच धनगर समाजानेही अहिल्याबाईंच्या नावासाठी राज्यभरात मोर्चे, आंदोलने केली होती. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर भंडारा उधळून आंदोलनाची धार वाढवली होती.
 
 
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत ही घोषणा केली. तसेच या नामांतराचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या आजच्या निकालानंतर शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेने या विरोधात मंगळवारी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. बुधवारी यावर तातडीने सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.