अमेरिकेचा पाकिस्तानला झटका; केवळ १२ महिन्यांचा मिळणार व्हिसा
   दिनांक :06-Mar-2019
वॉशिंग्टन :
 अमेरिकेने व्हिसाच्या धोरणात बदल करत पाकिस्तानी नागरिकांना पाच ऐवजी केवळ १२ महिन्यांचा व्हिसा मिळणार आहे. तर पत्रकारांना परवाना नुतनीकरण केल्याखेरीज तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहता येणार नाही. त्याचबरोबर शुल्कातही मोठी वाढ केली आहे.
 
 
 
 
अमेरिकेतील नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी ट्रम्प प्रशासनाने एच१ बी १ या व्हिसा प्रकारावर प्रतिबंध आणण्याचे ठरविले होते. मात्र, देशातील कंपन्यांकडून विरोध झाल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. आता अमेरिकेने पाकिस्तानची दहशतवाद्यांना मदत करण्याची भुमिकेविरोधात कडक पाऊले उचलण्याचे ठरविले आहे. यानुसार अमेरिकेने पाकिस्तानच्या नागरिकांना मिळणाऱ्या व्हिसाच्या मुदतीमध्ये कमालीची कपात केली असून केवळ १ वर्षच पाकिस्तानी नागरिक अमेरिकेमध्ये राहू शकणार आहेत. याआधी ही मुदत ५ वर्षे होती.
तसेच अमेरिकेमध्ये नोकरी, पत्रकारीता, बदली, धार्मिक कारणासाठी वेगवेगळे व्हिसा देण्यात येतात. या व्हिसासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्येही कमालीची वाढ केली आहे. आता व्हिसासाठी जादाची ३२ ते ३८ डॉलरची रक्कम मोजावी लागणार आहे. हा आदेश २१ जानेवारीपासून लागू करण्यात आला आहे. या आदेशाची प्रत इस्लामाबादच्या अमेरिकी दूतावासाने प्रसिद्ध केली आहे. यामुळे २१ जानेवारीनंतर ज्यांनी व्हिसासाठी अर्ज किंवा ज्यांना व्हिसा मिळाला आहे त्यांच्यासाठी नवे नियम लागू झाले आहेत.
शुल्कवाढ केल्याने पत्रकारांच्या व्हिसासाठी १९२ डॉलर तर इतरांसाठी १९८ डॉलर मोजावे लागणार आहेत. अमेरिकेने गेल्या वर्षी पाकिस्तानी नागरिकांचे ३७ हजार अर्ज नाकारले आहेत.
यामागे अमेरिकेने पाकिस्तान व्हिसाबाबतच्या धोरणाचे उदारीकरण करण्यास असमर्थ ठरल्याचे म्हटले आहे. यामुळे अमेरिकेच्या कायद्यानुसार २१ जानेवारीपासून पाकिस्तानसाठी व्हिसाच्या कालावधीमध्ये कपात करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी व्हिसासाठी आकारण्यात येणाऱ्या रक्कमेएवढीच शुल्कात वाढ करण्यात आल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेने या व्हिसाप्रकाराच्या नियमांत बदल केलेले असले तरीही व्यावसायीक, पर्यटन आणि वैद्यकीय व्हिसाबाबत नियम बदलल्याचे स्पष्ट केलेले नाही. हे व्हिसा B1 आणि B2 या प्रकारात येतात.