आप आणि कॉंग्रेस आघाडीचा घोळ...
   दिनांक :07-Mar-2019
 दिल्ली वार्तापत्र 
 - शामकांत जहागीरदार 
 
दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघांत कॉंग्रेस आणि आप यांच्यात आघाडी होणार नसल्याचे चित्र सध्या दिसत असले, तरी याबाबत आताच नेमका अंदाज करत येणार नाही. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्या प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या शीला दीक्षित यांनी आपशी आघाडी करण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळली असली, तरी दोन पक्षांतील चर्चेची शक्यता मावळली नाही.
 
कॉंग्रेसने आपल्याशी आघाडी करावी, असा आपचा आग्रह आहे, नव्हे, आप हट्‌टालाच पेटली आहे. कॉंग्रेसची त्याला अद्याप पूर्ण तयारी दिसत नाही. हा प्रकार म्हणजे आपल्याशी लग्न करावे म्हणून एखाद्या मुलाने मुलीच्या पाठीमागे लागण्यासारखा आहे. मुळात लग्न करायला मुलाला मुलगी पसंत असली, तरी मुलीलापण तो मुलगा पसंत पडला पाहिजे. मुलीला मुलगा पसंत नसला, तरी मुलाने त्या मुलीमागे लग्नासाठी हट्‌ट धरण्यासारखा हा प्रकार दिसतो आहे.
 
आपशी आघाडी करायला कॉंग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते तयार आहेत, पण प्रदेश पातळीवरील नेत्यांचा त्याला विरोध आहे. यात प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शीला दीक्षित आणि त्यांचे सहकारी आघाडीवर असल्याचे समजते. गंमत म्हणजे प्रदेश कॉंग्रेसचे मावळते अध्यक्ष अजय माकन यांनी अध्यक्षपदावर असताना आपशी आघाडी करायला विरोध केला होता. त्या वेळी शीला दीक्षित यांनी आपशी आघाडी करायची तयारी दर्शवली होती. अजय माकन यांना अध्यक्षपदावरुन हटवून त्या जागी शीला दीक्षित यांना आणण्यामागे अन्य कारणांसोबत हेही एक प्रमुख कारण होते. मात्र पद बदलले की भूमिकाही बदलतात, याप्रमाणे आता आपशी आघाडी करायला शीला दीक्षित विरोध करत आहेत, तर अजय माकन आघाडीचा आग्रह धरत आहेत. त्यामुळे आपसोबतच्या आघाडीबाबत कोणता निर्णय घ्यावा, याबाबत राहुल गांधी गोंधळलेले दिसतात.
 
राहुल गांधींशी झालेल्या चर्चेनंतर शीला दीक्षित यांनी मंगळवारी आपशी आघाडी करण्याची शक्यता फेटाळून लावली आणि स्वबळावर सातही जागा लढवण्याची घोषणा करून आघाडीचे दोर कापण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल भडकले आणि त्यांनी कॉंग्रेस आणि भाजपाचा गुप्त समझौता असल्याचा आरोप केला. भाजपाविरोधी मतांत फूट पाडण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप करायलाही केजरीवाल यांनी मागेपुढे पाहिले नाही.
मुळात कॉंग्रेसने आपशी आघाडी करावी, असा केजरीवाल यांचा आग्रह आहे. यासाठी ते ‘हात’ धुवून कॉंग्रेसच्या पाठीमागे लागले आहेत. एकीकडे कॉंग्रेसने आपल्याशी आघाडी करावी असा केजरीवाल यांचा आग्रह असताना ते आणि अन्य आप नेत्यांची वागणूक मात्र, कॉंग्रेसनेते आपल्याशी आघाडी कशी करतात, ते पाहतोच, अशी आहे. आघाडीच्या बाबतीत आप नेत्यांची वागणूक सुरुवातीपासूनच दुटप्पी राहिली आहे. दिल्ली विधानसभेत आपच्या आमदारांनी राजीव गांधी यांची ‘भारतरत्न’ उपाधी परत घ्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव पारित करून घेतला होता. केजरीवाल यांच्या संमतीशिवाय आप नेते असा प्रस्ताव पारित करून घेण्याची शक्यता नाही.
 
 
 
जागावाटपाची चर्चा सुरू असताना आपने दिल्लीतील सातपैकी सहा लोकसभा मतदारसंघांतील आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणाही करून टाकली. आतापर्यंत केजरीवाल यांनी कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारावरून रान उठवले होते. केजरीवाल भाजपावर जेवढ्या जोराने हल्ला चढवत होते, तेवढ्याच जोमाने त्यांनी कॉंग्रेसवरही हल्ला चढवण्याची एकही संधी सोडली नाही. काही झाले तरी मी कधीही कॉंग्रेसशी आघाडी करणार नाही, असे केजरीवाल यांनी आपल्या मुलीची शपथ घेत जाहीर केले होते. मात्र, आपले राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचे पाहताच, आघाडीसाठी कॉंग्रेसच्या पायांवर लोटांगण घालायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
 
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा भाजपाने िंजकल्या होत्या. या निवडणुकीत आप दुसर्‍या, तर कॉंग्रेस तिसर्‍या स्थानावर होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या स्थानावरील पक्षाला रोखण्यासाठी दुसर्‍या स्थानावरील पक्ष तिसर्‍या स्थानावरील पक्षाच्या मागे लागला आहे. दिल्लीत कॉंग्रेस आणि आप यांची आघाडी झाली, तर भाजपाच्या अडचणी वाढतील, याबाबत शंका नाही. त्यामुळे दिल्लीत आप आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडी होत नसल्याचे दिसताच भाजपाने सुटकेचा श्वास सोडणे स्वाभाविक आहे.
 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत आप आणि कॉंग्रेस यांच्या मतांची बेरीज अनेक ठिकाणी भाजपाच्या मतांपेक्षा जास्त होती. 2014 मध्ये चांदनी चौक मतदारसंघात भाजपाला 44.58 टक्के मते मिळाली होती. आपला 30.71, तर कॉंग्रेसला 17.94 टक्के मते मिळाली होती. पूर्व दिल्लीत भाजपाला 47.80 टक्के मते पडली होती. या ठिकाणी आपला 31.90, तर कॉंग्रेसला 16.98 टक्के मते मिळाली होती. पश्चिम दिल्लीत भाजपाच्या मतांची टक्केवारी 48.30 होती. आपला 28.38, तर कॉंग्रेसला 14.33 टक्के मते मिळाली होती. नवी दिल्ली मतदारसंघात भाजपाला 46.73 टक्के मते मिळाली होती. आपला 29.96 टक्के, तर कॉंग्रेसला 18.50 टक्के मते मिळाली होती. दक्षिण दिल्लीत भाजपाने 45.15 टक्के मते घेतली होती. आपला 35.45, तर कॉंग्रेसला 11.35 टक्के मते मिळाली होती. उत्तरपूर्व दिल्लीत भाजपाला 45.23 टक्के, आपला 34.30, तर कॉंग्रेसला 16.30 टक्के मते मिळाली होती. उत्तरपश्चिम दिल्लीत भाजपाने 46.40 टक्के, आपने 38.56, तर कॉंग्रेसने 11.61 टक्के मते घेतली होती.
 
निवडणुकीच्या राजकारणात नेहमीच दोन अधिक दोन चार होत नसले, तरी ते कधीच चार होणार नाहीत, असेही नाही. एकीकडे कॉंग्रेसने आपल्याशी आघाडी करावी म्हणून मागे लागताना, कॉंग्रेसचा अपमान करणेही केजरीवाल यांनी थांबवले नाही. कॉंग्रेससाठी आधी एक वा दोन जागा सोडण्याची तयारी आपने दर्शवली. कॉंग्रेसला मात्र किमान तीन जागा हव्या होत्या, त्याला केजरीवाल यांची तयारी नव्हती. त्यामुळे या दोन पक्षांत आघाडी होऊ शकली नाही. आता कदाचित केजरीवाल कॉंग्रेसला तीन जागा देऊ शकतात आणि कॉंग्रेस पुन्हा केजरीवाल यांच्याकडे हात पसरवू शकते.
 
दिल्लीत आमच्या सरकारची कामगिरी सर्वोत्तम असल्याचा दावा करणार्‍या आपवर कॉंग्रेसशी आघाडी करण्याची वेळ का आली, हा प्रश्न आहे. याचाच अर्थ, दिल्लीची जनता आता आपल्या नाटकांना बळी पडणार नाही, याची केजरीवाल यांची खात्री पटली आहे. आपशी आघाडी करावी म्हणून केजरीवाल यांनी राहुल गांधी यांच्यावर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा दबाव आणला असल्याचे समजते. त्यामुळे केजरीवाल यांच्याशी आघाडी नको म्हणून एकीकडे पक्षातील नेत्यांचा दबाव, तर दुसरीकडे करा म्हणून मित्रपक्षांच्या नेत्यांचा दबाव राहुल गांधी यांच्यावर येत आहे.
 
त्यामुळे आपसोबतच्या आघाडीचा मुद्दा राहुल गांधी यांनी आघाडीबाबतचा निर्णय घेण्यासाठी गठित करण्यात आलेल्या अँटोनी यांच्या समितीकडे सोपवला आहे. ही समिती दोन-तीन दिवसांत याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे समजते. कोणत्याही दोन पक्षांतील आघाडी समान मुद्यांवर आणि समान विचारसरणीवर होत असते, या दोन पक्षांत मोदीविरोध सोडला, तर असा कोणताही समानविचारसरणीचा मुद्दा नाही. एखाद्वेळ या दोन पक्षांत आघाडी झाली तरी ती निभवणे आणि टिकवणे दोन्ही पक्षांना सोपे नाही. लोकसभा निवडणुकीतील आघाडी आप विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवणार का? आप आणि कॉंग्रेस यांची आघाडी वरच्या पातळीवर झाली, तरी ती खालच्या पातळीपर्यंत झिरपणार का? दोन्ही पक्षांचे नेते कोणत्या तोंडाने एकदुसर्‍याच्या उमेदवाराला मत द्या म्हणून जनतेकडे जातील, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते प्रचारात जुने सगळे विसरून एकदिलाने सहभागी होतील का? एखाद्वेळ आपची मते कॉंग्रेसला हस्तांतरित होऊ शकतील, पण कॉंग्रेसची मते आपकडे जाऊ शकतील का, असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होणार आहेत. या प्रश्नांची उत्तरे दिल्लीच्या जनतेला द्यायची आहेत, दिल्लीची जनता ती ईव्हीएममधून देईल. देशाच्या हिताच्या विरोधात असलेली अशी कोणतीही अपवित्र आणि संधिसाधू आघाडी दिल्लीची जनता खपवून घेणार नाही, याबाबत शंका नाही...