जय हिंद !
   दिनांक :07-Mar-2019
फारच मजेदार देश आहे बरं आपला! इथे कुठल्याही मुद्यावर लोकांचा राग अनावर होतो. कुठल्याही विषयासंदर्भात ते नको तितके भावुक होऊ शकतात. कुठल्याही गोष्टीसाठी त्यांचा त्रागा होतो. त्यांना कुठल्या बाबींबाबतचा आनंद गगनात मावेनासा होईल अन्‌ कुठल्या प्रसंगी ते संताप व्यक्त करायला रस्त्यावर उतरतील, याचाही नेम राहिलेला नाही अलीकडे. इथल्या नागरिकांच्या डोक्यात लोकशाही जरा जास्तच शिरली आहे की काय, असे वाटू लागले आहे आताशा. या देशात सर्वसामान्य माणसांची स्वत:ची अशी मतं नव्हतीच आजवर कधी. त्यांनी सारासार विचार केला अन्‌ स्वत: निर्णय घेऊन एखादी कणखर भूमिका घेतली, त्यानुरूप वर्तणूक केली, असे सहसा घडत नाही.
 
त्यांचं नेतृत्व करणार्‍या व्यक्तीवर, त्या व्यक्तीच्या विचारांवर, त्याच्या राजकीय फायद्या-तोट्यावर त्याच्या समर्थकांची भूमिका ठरत राहते. कुणाच्यातरी मागे असे बिनडोकपणे वाहवत जाणे, ही खरंतर त्या समूहाची चूक. पण, वर्षानुवर्षे तोच प्रघात सुरू आहे. नेत्याच्या मागे वणवण भटकत राहण्याची रीत अजूनही तशीच कायम आहे. या लोकांची मतं, स्वत:च्या सोयीनुसार घडवून आणण्याची आणि त्यानुसार ती प्रवाहित करण्याची नेतृत्वाची तर्‍हाही एव्हाना रूढ झाली आहे. मग सरकारचा एखादा निर्णय चूक की बरोबर हेदेखील, वस्तुस्थितीपेक्षाही समूहाचे नेतृत्व करणार्‍या व्यक्तीच्या विचारशैलीवर, त्याच्या राजकीय कलावर ठरते. २०१४ च्या सत्तांतरानंतर तर भाजपाविरोधक जणू चेकाळल्यागत वागू लागले आहेत. सरकारचा कुठलाही निर्णय त्यांच्यालेखी चूक म्हणजे चूकच असतो. विरोधकांच्या समर्थकांनाही वास्तवाचे भान राखण्याची गरज उरलेली नाही. तेही त्यांच्या नेत्यांनी केलेल्या दिशादर्शनानुसार होड्या वल्हवताहेत...
 
विचार करण्याच्या या एककल्ली पद्धतीने अनेक समाजोपयोगी, राष्ट्रहिताचे निर्णयही अकारण वादग्रस्त ठरत आहेत. किंबहुना ठरवले जाताहेत. सरकारचा निर्णय आहे ना, मग तो बादच ठरवला पाहिजे, तो योग्य असला तरीही, ही कुठली तर्‍हा झाली कोण जाणे, पण गेले दिवस हे असले बेताल वागणेच सुरू आहे. कुणी चौकीदार चोर असल्याची आवई उठवतोय्‌, कुणाला पाकिस्तानातील दहशवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात नेमके किती लोक मेलेत याची आकडेवारी हवीय्‌. अजब तमाशा मांडलाय्‌ या लोकांनी! बरं, कुणाच्या विरोधावर आक्षेप नाहीच. तो तर लोकशाहीव्यवस्थेने बहाल केलेल्या त्यांच्या अधिकाराचा भाग आहे. पण, त्यालाही काही तारतम्य असावे की नाही? त्याचाही काही स्तर असावा की नाही? एक पाकिस्तान आहे, जिथे दहशतवाद जोपासला जात असल्याबद्दल जगात कुणालाच शंका नाही. कायम अशांत असलेला अन्‌ भारताविरुद्ध सतत कुरघोड्याच करीत राहिलेला हा देश... त्याच्या पंतप्रधानाला शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराच्या स्पर्धेत उभे करताना जराशी लाज वाटली नाही तिथल्या राजकारण्यांना.
 
भारतात मात्र, हल्ल्यात एकही माणूस मेला नाही, या पाकिस्तानी पंतप्रधानांच्या विधानावर विश्वास ठेवला जातोय्‌ ‘आपल्या’ पंतप्रधानांच्या दाव्यापेक्षाही. ‘हा’ दर्जा असणार आहे भविष्यात भारतीय राजकारणाचा? अन्‌ यांना आदर्श मानून स्वत:ची मतं ठरवणार आहे भारतीय जनता? ज्यांनी जनमत घडवायचे, त्या माध्यमांनी विंग कमांडर अभिनंदनच्या पाकिस्तान परतीच्या मुहूर्तावर मांडलेला तमाशा तर चीड आणणारा होता. युद्धजन्य परिस्थितीत कसे वागू नये, हे सिद्ध करण्यासाठीच जणू प्रत्येकाची धडपड चालली होती. त्या क्षेत्रातला एकाहून एक नमुना, स्वत:च्या बुद्धीच्या हीन पातळीचे प्रदर्शन मांडत सुटला होता...
 
आता परवा केंद्र सरकारने एक निर्णय जाहीर केला. एअर इंडियातल्या सर्व विमानात प्रवासादरम्यान अथवा विमानतळांवर प्रवाशांसाठीच्या सूचना देऊन झाल्यावर प्रत्येकाने शेवटी ‘जय हिंद’ म्हणावे, असा आदेश स्पष्ट करणारे एक सरकारी परिपत्रक जारी झाले अन्‌ सरकारविरोधाचा ज्वर अधिकच तीव्र झाला. याने काय देशभक्ती निर्माण होणार आहे का, इथपासून तर, एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाचे काय, असे विविध निर्बुद्ध प्रश्न उपस्थित करण्यासाठी सर्वांमध्ये अहमहमिका लागली. आधी कर्मचार्‍यांच्या वेतनाचे प्रश्न सोडवा, मगच ‘जय हिंद’ म्हणण्याचा नियम लागू करण्याचा आग्रह धरा, असेच सांगण्याचा प्रयत्न करतोय्‌ प्रत्येक जण.
 
 
 
आपण काय बरळतोय्‌, कसले अकलेचे तारे तोडतोय्‌, याचे भानही राखण्याची गरज वाटत नाही इथे कुणालाच? काय संबंध कर्मचार्‍यांनी ‘जय हिंद’ म्हणण्याचा आणि त्यांच्या वेतनाचा? या कर्मचार्‍यांचे वेतन वेळेवर होत नाही, हा त्या कंपनीच्या व्यवस्थापनाचा दोष आहे. त्याबाबत आग्रह धरण्याचा, व्यवस्थापनाला कर्मचार्‍यांनी धारेवर धरण्याचा अधिकारही कुणी अमान्य करीत नाही. पण, ‘जय हिंद’ म्हणण्याचे परिपत्रक जारी होताच, जे लोक बेलगाम बरळत सुटलेत, ते बघितल्यावर सरकारने हा निर्णय मागे घेतला की, लागलीच या कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार असल्याचा भास होतो! काय अजब लोक आहेत या देशातले! इथे चित्रपटगृहात राष्ट्रगीत म्हणण्याची सक्ती करण्याचाही सरकारला अधिकार नाही, की ते त्याच्या कर्मचार्‍यांना एखादी राष्ट्रभक्तिपर घोषणा देण्यासही सांगू शकत नाही? लोकांना राष्ट्रगीत म्हणायचाही त्रास अन्‌ ‘जय हिंद’ची घोषणा ऐकण्याचाही कंटाळाच? तरी बरं सरकारने या घोषणेची सक्ती फक्त त्याच्या कर्मचार्‍यांवरच केली आहे, प्रवाशांवर नाही.
 
पण, सरकारचा हा आदेश जारी झाल्याबरोबर जणू आकाश कोसळल्याच्या थाटातला उच्चरवातला कांगावा सुरू झाला आहे सर्वदूर. अशाने कुठे राष्ट्रभक्ती निर्माण होत असते का, इथपासून अनेकानेक प्रश्नांचा भडिमार सुरू झाला आहे. एकूण काय, तर ‘जय हिंद’ म्हणण्याची सक्ती, इथल्या काही दीडशहाण्यांना रुचलेली नाही. या शहाण्यांची स्वत:ची स्वतंत्र अशी शैली आहे. त्यांना सरकारची कुठलीच गोष्ट आवडत नाही. तसे काही घडलेच, तर सरकारवर तुटून पडायलाही ते सज्ज असतात. आताही तेच घडले आहे. एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांना ‘जय हिंद’ म्हणण्याची सक्ती म्हणजे त्यांच्यालेखी राष्ट्रावरचे संकट ठरले आहे. अजून कर्मचार्‍यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घसरलेलं नाही कुणी. पण, ती ओरड सुरू झाली तरी नवल नाहीच! टॉकीजमध्ये नाही का, राष्ट्रगीत सुरू झाल्यावरही काही बेशरम लोक निर्लज्जपणे बसून राहतात जागेवर. त्यांच्या त्या वागण्यावर कुणी आक्षेप नोंदवलेलाही चालत नाही त्यांना. फक्त हिंदुस्थानवरच्या प्रेमाचे, इथल्या राष्ट्रध्वजाबाबतच्या आदराचे दर्शन घडवायचे म्हटले की व्यक्तिगत स्वातंत्र्याचे ढोल बडवणे सुरू होते. खरंच दुर्दैव आहे या देशाचे. ‘वंदे मातरम्‌’ला विरोध करणार्‍यांची गर्दी अजून विरळ झालेली नसताना, ‘जय हिंद’च्या घोषणेला विरोध करण्यास धजावणार्‍या निर्लज्ज अन्‌ निर्बुद्धांच्या नव्या जमातीची पैदास आता झाली आहे.
 
सरकारला, त्याच्या एखाद्या निर्णयाला, विरोध करण्याचे राजकारण करताना किती खालची पातळी गाठायची, याचे तारतम्य विसरलेले हे लोक जर आता तद्दन फालतू कारणे पुढे करून ‘जय िंहद’च्या घोषणेची खिल्ली उडवणार असतील, तर त्यांना भर चौकात उभे करून चाबकाचे फटके हाणले गेले पाहिजेत, खरंतर. पण या देशाचे दुदैव असे की, राष्ट्रभक्तीचे निकष स्वत:च्या सोयीने निश्चित करणार्‍या गर्दीचीच सध्या चलती आहे. चांगले असो की वाईट, योग्य असो की अयोग्य, चूक असो की बरोबर... त्यांचे पिपाण्या वाजवणे सुरू आहे. यांच्या नाकावर टिच्चून केलेला ‘जय हिंद’चा जयघोष हेच त्यांच्या बावळटपणाला उत्तर आहे! कारण ‘जय हिंद’चा नारा हा अभिमानाचा विषय आहे. वादाचा नाही, हे त्यातूनच सिद्ध होणार आहे...