जम्मूमधील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला; ३२ जण जखमी
   दिनांक :07-Mar-2019
जम्मूमधील बस स्थानकावर १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. बस स्थानकावरील तिकीट खिडकीच्या दिशेने ग्रेनेड टाकण्यात आला होता, यानंतर मोठा स्फोट झाला. हल्ल्यात ३२ जण जखमी झाले असून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. ग्रेनेड टाकण्यात आला तेव्हा सुदैवाने बस स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित नव्हते. अन्यथा आकडा जास्त असण्याची भीती होती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचे नेमके कारण तसेच कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता याचा शोध घेतला जात आहे.

 
 
जम्मूचे आयजीपी एम के सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी हल्ला होईल अशी शक्यता होती आणि पोलीस त्यादृष्टीने सर्व उपाययोजना करत होते. मात्र कोणतीही ठराविक माहिती देण्यात आलेली नव्हती. याआधीही दहशतवाद्यांनी अनेकदा बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला करत टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
जम्मू बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी असते. याशिवाय इतर राज्यांसाठीही येथून बस सोडल्या जातात. मात्र हल्ला झाला तेव्हा सुदैवाने प्रवाशांची गर्दी नव्हती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या हा पहिला दहशतवादी हल्ला असून यामध्ये ३२ जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला.