अनिल अंबानीच्या कंपनीला 'जॅकपॉट'; गुजरात विमानतळाचे ६४८ कोटींचे मिळाले कंत्राट
   दिनांक :07-Mar-2019
 उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला (आर इन्फ्रा) भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) ६४८ कोटी रूपयांचे काम दिले आहे. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे नवीन विमानतळ उभारले जाणार आहे. नवीन विमानतळ हे अहमदाबाद आणि राजकोटला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८ ब येथून जाणाऱ्या मार्गावर आहे. सध्या कार्यरत असलेल्या राजकोट विमानतळापासून नवीन विमानतळ हे ३६ किमी दूर आहे. आर इन्फ्राने लार्सन अँड ट्रूबो, दिलीप बिल्डकॉन तसेच गायत्री प्रोजेक्ट्स समवेत ९ कंपन्यांपेक्षा कमी रकमेची बोली लावून हे काम मिळवले.
 
 
 
आर इन्फ्राने एक निवेदन प्रसिद्ध करुन म्हटले आहे की, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. ई अँड सीला (इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन्स) गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे नवीन विमानतळ बनविण्याचे काम मिळाले आहे. हे काम ६४८ कोटी रूपयांचे आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की, या करारात रनवे निर्मिती, टर्निंग पॅड, टॅक्सी लाइन, रस्ते, अग्निशामक स्थानक, कुलिंग पिट, एअरफिल्ड ग्राऊंड लायटिंग योजनेचे परीक्षणसह नेव्हिगेशन आणि पक्षांमुळे होणारी अडचण कमी करण्यासाठीचा उपाय आदी कामांचा समावेश आहे. रिलायन्स इन्फ्राचे ९ कंपन्यांमध्ये तांत्रिक गुण हे ९२.२ टक्के होता. काम करण्याची ऑर्डर मिळाल्यानंतर ३० महिन्याच्या आत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे.