'गुगल-पे'चा वापर करून व्यापाऱ्यांना गंडा
   दिनांक :07-Mar-2019
नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज
 
वर्धा : डिजिटल पेमेंट सुविधेने आर्थिक व्यवहार जरी सोपे झाले असले तरी यामुळे फसवणुकीच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्धेत गुगल-पे या डिजिटल पेमेंटच्या वापर करून तीन व्यापाऱ्यांना हजारोंनी गंडविल्याचे समोर आले आहे. पहिल्या घटनेत टायर विक्रेते रवींद्र कुचेवार यांना १२ हजारांचा चुना लावण्यात आला. स्विफ्ट गाडीचे टायर खरेदीसाठी त्यांना एका ग्राहकाने १२ हजार रुपये गुगल-पे द्वारे पाठविण्याचे ठरविले.
 
 
त्यानंतर त्यांना एक लिंक पाठविण्यात आली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या खात्यातून १२ हजार रुपये डेबिट झाले. थोड्या वेळाने दुसरे टायर व्यावसायिक अतुल प्रभाकर यांच्या खात्यातून १४ हजार या प्रमाणे तीन वेळा ४२ हजारांची रक्कम डेबिट झाली. तिसऱ्या घटनेत एका व्यापाऱ्याला ७२ हजारांनी गंडविल्याचे उघड झाले. या तीनही घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपासात असे उघड झाले की, वरील सर्व तक्रारींमध्ये आरोपी हे इंटरनेटवर वेगवेगळया जिल्हयांची नावे टाकून त्यामध्ये हाॅटेल व्यावसायिक, टायर डीलर, मोबाईल दुकानदार, हार्डवेयर डिलर, मेडीकल्स्, कपड्याचे व्यावसायिक असे वेगवेगळ्या व्यावसायिकांचे नंबर मिळवीतात व त्यांना फोन करून १५ ते २५ हजाराची एखादी मोठी ऑर्डर देवून गुगल-पे द्वारे पेमेंट करतो असे सांगतात, व व्यापा-यांच्या कामाच्या व्यस्थतेचा फायदा घेत त्यांना त्या लिंकवर क्लीक करावयास लावून व्यापाऱ्यांच्या खात्यातले पैसे स्वतःच्या खात्यात वळते करतात. हे सर्व फोन राजस्थान मधून येत असून सायबर पोलीस पुढील तपास करत आहे.
 
 
अश्या गैर व्यवहारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
 
आपण पैसे स्वीकारत असतांना गुगल पे ने थेट रक्कम आपल्या खात्यात येवू शकते त्याकरीता कोणत्याही लिंकवर क्लीक करण्याची गरज नाही.
 
आपणांस कोणतेही फोन येवून गूगल पे द्वारे रक्कम पाठवीत असल्याचे सांगीतल्यास अशा लिंक पासून सावध रहावे.
 
यामध्ये ओटीपी (वन टाईम पासवर्ड) ची सुध्दा गरज नसल्याने धोका वाढलेला आहे.