हाफिझ सईद दहशतवादीच
   दिनांक :07-Mar-2019
- काळ्या यादीतून नाव वगळण्याची विनंती फेटाळली 
- संयुक्त राष्ट्रात भारताचा मोठा विजय
 
नवी दिल्ली:
 लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11 रोजीच्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद हा दहशतवादीच आहे, असा स्पष्ट निर्वाळा देताना, प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीतून आपले नाव वगळण्याची हाफिझची विनंती संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळून लावली. भारताने हाफिझविरोधात संयुक्त राष्ट्राला आधीच ठोस पुरावे दिले असल्याने, भारताचा हा मोठा विजयच मानला जात आहे.
 
 
 
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरविरोधातही ठोस पुरावे संयुक्त राष्ट्राकडे सोपविले आहेत. त्यालाही आंतरराष्ट्रीय अतिरेक्यांच्या यादीत टाकण्यासाठी फ‘ान्स लवकरच प्रस्ताव आणणार आहे, त्यातच या जागतिक मंडळाने हाफिझवरील बंदी उठविण्यास नकार देऊन, अतिरेक्यांचे पालनपोषण करणार्‍या पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे.
 
पाकिस्तानातील प्रख्यात वकील हैदर रसूल मिर्झाने संयुक्त राष्ट्रात हाफिझची बाजू मांडली होती. ती फेटाळून लावली असल्याची माहिती मिर्झाला एका पत्राद्वारे कळविण्यात आली.
 
मुंबईवरील सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने 10 डिसेंबर 2008 रोजी हाफिझला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकले होते. हाफिझने 2017 मध्ये मिर्झाच्या वतीने, आपल्याला काळ्या यादीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती करणारा अर्ज दाखल होता. या अर्जावरील सुनावणीच्या काळात भारत, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससह अनेक देशांनी सडकून विरोध केला. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर, हाफिझ हा दहशतवादीच आहे आणि त्याच्याविरोधात उपलब्ध असलेले सर्व पुरावे विचारात घेता, त्याला काळ्या यादीतून बाहेर काढण्याची विनंती करणारा अर्ज आम्ही फेटाळून लावत आहोत, असे संयुक्त राष्ट्राच्या लवादाने आपल्या निकालात स्पष्ट केले.
 
विशेष म्हणजे, आम्ही आमच्या देशातील सर्वच अतिरेकी आणि त्यांच्या गटांविरुद्ध कारवाई करीत आहोत, हा नवा पाकिस्तान आहे, असे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलीकडेच जाहीर केले असतानाही, पाकिस्तानने हाफिझच्या अर्जाला विरोध न करता, उलट त्याच्या भूमिकेचे समर्थनच केले होते.